कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारपासून (दि. २२) पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून पाणीपुरवठा बंद झाला असून पर्यायी असलेल्या शिंगणापूर, बालिंगा, नागदेववाडी उपसा केंद्रातून शहराला पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, कळंबा तलावातील पाणी पातळी घटल्याने ही योजनाही दोन दिवसांत बंद होण्याची शक्यता आहे.
नद्यांत पाणी नसल्याने गेल्या आठवड्यात सर्व उपसा केंद्रे बंद पडली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात शहरात तीव्र पाणी टंचाई झाली होती. त्यामुळे महापालिकेने ५ ते २५ हजार लिटर क्षमतेचे २८ टँकर भाड्याने घेतले होते. मात्र आता शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत सुरू झाल्याने भाड्याचे सर्व टँकर बंद करण्यात आले. महापालिकेच्या चार टँकरद्वारे मागणीनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे.