Kolhapur Shed Fire news 
कोल्हापूर

Kolhapur Shed Fire news: 'शॉर्ट सर्किट'ने केंबूर्णेवाडीत शेडला आग

ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला!

पुढारी वृत्तसेवा

​विशाळगड : सुभाष पाटील

विशाळगड मार्गावरील केंबूर्णेवाडी येथे आज पहाटे महावितरणच्या मुख्य वाहिनीमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे एका शेतकऱ्याच्या शेडला आग लागली. मात्र, ग्रामस्थ आणि तरुणांनी दाखवलेल्या धैर्यामुळे आणि प्रसंगावधानाने मोठी जीवितहानी व वित्तहानी टळली आहे. या धाडसी तरुणांचे सर्वत्र कौतुक होत असले तरी महावितरणच्या कारभाराबाबत मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

​ नेमकी घटना काय? :

​रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास केंबूर्णेवाडी येथील महावितरणची मुख्य विद्युत वाहिनी अचानक शॉर्ट सर्किट झाली. या शॉर्ट सर्किटमुळे आगीचे गोळे (किठूळ) थेट रस्त्यालगत असलेल्या अनंत तुकाराम निवळे यांच्या शेडवर पडले. शेडवर गवत असल्याने काही क्षणातच शेडने पेट घेतला आणि धुराचे लोट आकाशात दिसू लागले. पहाटेची वेळ असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती.

​ दूध उत्पादकांच्या सतर्कतेने ग्रामस्थ जागे :

​पहाटेची वेळ असल्याने शेतकरी डेअरीला दूध घालण्यासाठी घराबाहेर पडले होते. शेडला लागलेली आग आणि धूर पाहताच या दूध उत्पादकांनी आरडाओरडा करून गावाला जागे केले. आगीचे भीषण स्वरूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले.

​ जीवाची पर्वा न करता तरुणांचे बचावकार्य :

​आग वाढत असतानाच गावातील धाडसी तरुण सोनाजी जाधव, आनंद जाधव आणि पांडुरंग निवळे यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता घटनास्थळी धाव घेतली. या तरुणांनी अत्यंत शिताफीने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली. त्यांच्या या समयसूचकतेमुळे अनंत निवळे यांचे शेड पूर्णपणे खाक होण्यापासून वाचले, तसेच आजूबाजूला असलेल्या घरांनाही आगीची झळ बसली नाही.

​या घटनेमुळे महावितरणच्या जुन्या आणि धोकादायक विद्युत वाहिन्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मुख्य तारा थेट शेडच्या वरून गेल्या असून त्या एकमेकांना चिकटलेल्या आहेत. वारंवार होणाऱ्या या शॉर्ट सर्किटमुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र संतापलेल्या ग्रामस्थांनी महावितरणने या तारांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.

कोट :

​ "विद्युत तारा एकमेकांना चिकटलेल्या आहेत आणि त्या थेट शेडच्या वरून जातात. वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष झाले, ज्याचा फटका आज बसला असता. तरुणांनी वेळीच धाव घेतली म्हणून अनर्थ टळला." > — आनंद जाधव, केंबूर्णेवाडी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT