गुडाळ : कळंकवाडी ता. राधानगरी येथील राहुल वसंत पाटील (वय 28) या तरुणाच्या दुचाकीला मुंबई - गोवा महामार्गावर महाड नजीक रविवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने राहुल आणि त्याची कंपनीतील सहकारी मैत्रीण कु. अनुष्का जालिंदर मानकर (वय 25) रा. येडेमच्छिंद्र असे दोघेही जागीच ठार झाले.
रविवारी पहाटे या अपघाताचे वृत्त महाड पोलिसांनी कळंकवाडीत कळवल्यानंतर राहुल चे वडील आणि काही ग्रामस्थ तातडीने महाडकडे रवाना झाले. छोट्याशा कळंकवाडीवर या दुर्घटनेमुळे दिवसभर शोककळा पसरली होती. मात्र घरी एकट्या असलेल्या राहुल च्या आईला या अपघाताची ग्रामस्थांनी गंधवार्ताही लागू दिली नव्हती मुंबई पोलीस दलात असलेला राहुल चा कळंकवाडी येथील मित्र योगेश भोसले याला अपघाताची माहिती मिळताच मुंबईतून महाडला पोहचला आणि त्याने तेथील सोपस्कर पूर्ण करण्यास पाटील कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना मदत केली.
भोगावती महाविद्यालयात विज्ञान शाखेतून पदवीधर झालेला राहुल गेली चार वर्षे महाड एमआयडीसी मधील एका केमिकल कंपनीत नोकरी करत होता. अविवाहित असलेल्या राहुलच्या पश्चात आई-वडील आणि दोन विवाहित बहीणी आहेत. रात्री उशिरा राहुल वर कळंकवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.