‘काळम्मावाडी’त वापराचे केवळ पाऊण टीएमसी पाणी 
कोल्हापूर

Kalammawadi Dam : ‘काळम्मावाडी’त वापराचे केवळ पाऊण टीएमसी पाणी

भीषण पाणीटंचाईचे सावट; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे/तुरंबे : जिल्ह्याच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा कणा मानल्या जाणार्‍या काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणात केवळ २.२३ टीएमसी इतकाच एकूण पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी १.४३ टीएमसी हा मृतसाठा असल्याने प्रत्यक्ष वापरासाठी केवळ ०.८० टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे, म्हणजेच धरणाच्या उपयुक्त साठ्यापैकी अवघे ८.७९ टक्के पाणी वापरासाठी उपलब्ध आहे. ही परिस्थिती जलसंपदा विभागासह नागरिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे.

यंदा रोहिणी नक्षत्रापासून सुरू झालेली पावसाची प्रतीक्षा मृग नक्षत्रही संपत आले तरीही संपलेली नाही. दुसरीकडे, धरणाच्या मुख्य भिंतीवरील गळती दुरुस्तीच्या कामासाठी यावर्षी पाणीसाठा मर्यादित ठेवण्यात आला होता. तसेच, मागील काही महिन्यांत विविध गरजांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने धरणातील उपलब्ध पाणी झपाट्याने कमी झाले आहे.

नदीपात्रात केवळ गळतीचे पाणी जात आहे. त्यामुळे दूधगंगा नदीवरील अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. येत्‍या काही दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

  1. धरणाच्या बांधकामापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे कागदोपत्री दिसणारा पाणीसाठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध पाणीसाठा यामध्ये तफावत असू शकते. धरणातील गाळाचे अचूक सर्वेक्षण झाल्यानंतरच प्रत्यक्षात किती पाणी उपलब्ध आहे, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

  2. सध्या धरणामध्ये असणारा उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर जर पावसाने बरसणे सुरू केले नाही, तर या धरणामध्ये जागोजागी असणारा मृतसाठा वापरण्याची वेळ येऊ शकते. प्रामुख्याने पाऊस जर थांबतच चालला, तर पाणीदार जिल्ह्यावर पाणीसंकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT