शिरढोण : येथील जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या पाणीटाकीच्या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासनावर संशयाचे सावट निर्माण झाले आहे. ऑडिटची प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात असून नेमके कोणाच्या दबावाखाली हे काम थांबवण्यात आले आहे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करू लागले आहेत.
ग्रामसभेत पाणीटाकीच्या जागेची निवड, निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि अर्धवट अवस्थेत बंद पडलेल्या कामावरून जोरदार वाद झाला होता. त्यानंतर संबंधित कामाचे स्वतंत्र स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल ग्रामसभेसमोर ठेवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही ऑडिटबाबत कोणतीही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे.
जर बांधकाम योग्य असेल तर ऑडिट करण्यास प्रशासन का टाळाटाळ करत आहे? ऑडिटमुळे कोणाचे हितसंबंध उघड होण्याची भीती आहे का? अशा प्रश्नांची चर्चा गावात सुरू आहे. ग्रामसभेच्या निर्णयालाच केराची टोपली दाखवून प्रशासन कोणाचे संरक्षण करत आहे, असा आरोपही ग्रामस्थांकडून केला जात आहे. जलजीवन योजनेसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पात पारदर्शकता राखण्यासाठी तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सार्वजनिक करावा अशी मागणी होत आहे.