कासारवाडी : सादळे (ता. करवीर) येथील जंगल परिसरात सोमवारी पूर्ण वाढ झालेल्या गव्याचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक तपासणीनंतर उष्माघात किंवा विषबाधेचा प्रकार असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
वनरक्षक विकास घोलप आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष वाळेकर तातडीने दाखल झाले. पण रात्र झाल्यामुळे मंगळवारी सकाळी पशुवैद्यकांनी मृत गव्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. वन विभागाने पंचनामा करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ झाली असून जंगलातील पाणवठे आटले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर गव्याचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी शक्यता स्थानिक वन्यजीव प्रेमींनी व्यक्त केली आहे.