कोल्हापूर : शिवाजी पेठेतील महाकाली मंदिर परिसरात घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक ऑटो रिक्षात अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करणारा अड्डा पुरवठा विभागाने उद्ध्वस्त केला. या कारवाईत गॅस भरण्याच्या मोटारी, सिलिंडर्स आणि डिजिटल क्यूआर कोडसह सुमारे 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एका ऑटो रिक्षात बेकायदेशीरपणे गॅस भरला जात असल्याची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी लक्ष्मण माने यांच्या पथकाने धाड टाकली. महाकाली मंदिर परिसरातील एका कौलारू घराची झडती घेतली असता, तिथे बेकायदेशीर आणि जीवघेणे रॅकेट राजरोसपणे सुरू असल्याचे उघड झाले.
याप्रकरणी राजेंद्र चंद्रकांत मस्के (वय 48, रा. लक्षतीर्थ वसाहत) आणि स्वप्निल शिंदे (18) यांना ताब्यात घेण्यात आले असून, विनापरवाना व्यवसाय केल्याप्रकरणी त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पुरवठा निरीक्षक महेश काटकर, नमता कुडाळकर, तुषार पाटील, अभिजित खोत, लिपिक विपुल पाटील, जयवंत गोते, सुशीलकुमार खोंद्रे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील सहभागी झाले होते.