कोल्हापूर : गर्दीने गजबजलेल्या शहरात दररोज शेकडो माणसे एकमेकांना ओलांडून जातात; पण काही नजरा अशाही असतात, ज्या एखाद्याच्या वेदना पाहून थांबतात. अशाच एका संवेदनशील नजरेमुळे आठ दिवसांपासून रस्त्याच्या कडेला असहाय अवस्थेत पडलेल्या ६५ वर्षीय वृद्धाला अखेर जगण्याची नवी आशा मिळाली. नाव नाही, नातं नाही, आधार नाही तरीही माणुसकीने त्या वृद्धाला हात दिला.
दसरा चौक परिसरातील राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ हा वृद्ध गेल्या आठ दिवसांपासून उपेक्षित अवस्थेत पडून होता. शरीराला अनेक जखमा झाल्याने त्याला प्रचंड वेदना होत होत्या. बोलता येत नव्हते, स्वतःची ओळख सांगता येत नव्हती आणि उपचाराचे भान नव्हते. वृद्धाच्या आयुष्यातील अंधार मात्र वाढतच होता.
याच वेळी काही नागरिकांनी ही माहिती जीवदान सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष अरुण खोडवे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी सहकाऱ्यांसह त्या वृद्धापर्यंत धाव घेतली. उपचार आणि पुनर्वसनासाठी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने ‘एकटी’ संस्थेची रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आणि त्या वृद्धाला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मोहिमेत अरुण खोडवे, विश्वनाथ भोसले, वसंत लिंगनूरकर, अक्षय बागडी, अविनाश गायकवाड तसेच ‘एकटी’ संस्थेचे सागर कागले, उमाकांत कांबळे आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी नारायण पाटील यांनी योगदान दिले. रस्त्यावरील निराधार अपंगवती वृद्धाला उपचारासाठी नेताना जीवदान संस्थेचे स्वयंसेवक सहभागी झाले होते.