कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि परिसरात सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कमी झाला. मात्र, सायंकाळनंतर पावसाची बॅटिंग पुन्हा सुरू झाली. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख १७ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण सकाळी भरले. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांना पूर आला असून त्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पात्राबाहेर पडलेली पंचगंगा आता इशारा पातळीकडे चालली असून रात्री पाणी गंगावेस-शिवाजी पूल मार्गाजवळ आले होते. जिल्ह्यातील ५५ बंधाऱ्यांवर पाणी आल्याने, त्यासह १८ मार्गांवरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गाने वळवली आहे.
सोमवारीही पहाटेपासून दमदार पाऊस होता. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सकाळी ११ नंतर पावसाने शहर आणि परिसरात काहीशी उसंत घेतली. काही काळ सूर्यदर्शनही होत होते. मात्र, थांबून-थांबून जोरदार पाऊस बरसत होता. पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ सुरूच राहिली. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी सात वाजता ३२.११ फूट इतकी होती. दुपारी १२ वाजता ती ३३.६ फुटांवर गेली. रात्री अकरा वाजता ती ३४.५ फुटांवर गेली. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फुटांवर असून पावसाचा जोर कायम राहिल्यास मंगळवारपर्यंत ती गाठेल, अशी शक्यता आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळी साडेदहा वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत सरासरी ५२.३४ मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा (१०१.३ मि.मी.), शाहूवाडी (८७ मि.मी.) व राधानगरी (६५.७ मि.मी.) या तीन तालुक्यांसह १५ ठिकाणी अतिवृष्टी झाली.