आशिष ल. पाटील
गुडाळ : गोकुळची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम मुदतीत म्हणजे येत्या ४ ऑगस्टअखेर पूर्ण होणे अशक्य असल्याने निवडणूक प्रक्रियेस मुदतवाढ मागण्याचा निर्णय महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाचे सचिव अशोकराव गाडे यांनी याबाबत दै. ‘पुढारी’शी बोलताना दुजोरा दिला. प्राधिकरणाने विधिज्ञांकडून अभिप्राय मागविला असून लवकरच मुदतवाढीची मागणी केली जाणार आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी संलग्न प्राथमिक दूध संस्था पात्र -अपात्र ठरविण्यावरून शासन व न्यायालयीन पातळीवर दावे-प्रतिदावे सुरू आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम लांबत चालला आहे. मध्यंतरी पुंगाव (ता. राधानगरी) येथील स्वामी समर्थ दूध संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक त्वरित घेण्याची मागणी केली होती. यावर निकाल देताना न्यायालयाने ९० दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाबाबत शासकीय पातळीवर संदिग्धता निर्माण झाल्याने अंमलबजावणी उशिरा सुरू झाली. दरम्यानच्या काळात ‘कट ऑफ डेट’मधील काही संस्था अवसायनाच्या कारवाईमुळे तर काही संस्था गोकुळ पोटनियमाचे उल्लंघन झाल्याने अपात्र ठरल्या. साहजिकच प्रत्यक्षात निवडणूक प्रक्रिया अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे स्वामी समर्थ दूध संस्थेने ही प्रक्रिया ४ ऑगस्टपर्यंत सुरू न केल्यास सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सहकार विभाग ॲक्शन मोडवर आला असून सहकार निवडणूक प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात निवडणुकीला मुदतवाढ मागण्याचा निर्णय घेतला आहे.
सप्टेंबर किंवा ऑक्टोबरचा मुहूर्त
उपनिबंधक (दुग्ध) पुणे यांच्याकडून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात गोकुळ निवडणुकीसाठी कच्ची मतदार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २५ दिवसांत पक्की मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष मतदान होऊ शकते.
निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेली मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून ती अंतिम टप्प्यात असल्याने सर्वोच्च न्यायालयास विनंती केल्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया कार्यक्रमास मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा आहे.- अशोकराव गाडे, सचिव, महाराष्ट्र सहकार निवडणूक प्राधिकरण