टिंबर मार्केट परिसरात भडकले टोळीयुद्ध; 25 वाहनांची तोडफोड  
कोल्हापूर

Kolhapur Crime : टिंबर मार्केट परिसरात भडकले टोळीयुद्ध; 25 वाहनांची तोडफोड

जवाहरनगर, राजेंद्रनगरातील टोळीचा धुमाकूळ : दगड, काचांचा खच; म्होरक्यासह 7 गजाआड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जवाहरनगर, राजेंद्रनगर परिसरातील 30 ते 35 तरुणांच्या टोळक्याने सोमवारी मध्यरात्री टिंबर मार्केट, गंजीमाळ, राजाराम चौकासह परिसरात टोळीयुद्धातून प्रचंड दहशत माजविली. मोटार, रिक्षा, टेम्पो, दुचाकीसह 25 पेक्षा जादा वाहनांची तोडफोड केली. काही घरांवर दगडफेक केली. मध्यवर्ती चौकासह गल्लीबोळांत काचांचा खच पडला आहे. हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी म्होरक्यासह 7 जणांना अटक केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

म्होरक्या रुद्र सनी लोकरे (रा. राजेंद्रनगर), आरबाज बिजली, स्वराज्य स्वप्निल मोरे ऊर्फ गब्बर, आकाश संजय मासाळ, संतोष देविदास मोटे, अजय नागेश डोलारी, सौरभ शिवाजी पाटील, नावेद सनी मकानदार, आतिष, आदित्य, सागर जाधव, अजय मानेसह अनोळखी 7 ते 8 जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

खुन्नस देण्यावरून वाद

एकमेकांना खुन्नस देण्यावरून वरुण थोरात, रणवीर थोरात यांच्याशी मुख्य संशयित रुद्र लोकरे, आरबाज बिजली यांच्यात शिवाजी पेठेतील एका कॉलेज आवारात डिसेंबर 2025 मध्ये वादावादी झाली होती. तेव्हापासून वाद धुमसत होता. लोकरेसह त्याच्या टोळीने सोमवारी मध्यरात्री हल्ला केल्याचे सांगण्यात आले. हल्ल्यासाठी 17 वाहनांचा वापर करण्यात आला.

टिंबर मार्केट, गंजीमाळप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी सायंकाळपर्यंत 7 जणांना अटक केली आहे. त्यामध्ये संतोष मोटे, अजय डोलारी, आकाश मासाळ, सौरभ पाटील, स्वराज्य मोरे, नावेद सनी मकानदार, शैलेश धनवडे या संशयितांचा समावेश आहे. फरार संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत, असे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT