Food adulteration Pudhari
कोल्हापूर

Kolhapur News : अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा

भेसळखोरांचे धाबे दणाणले; कारवाईच्या भीतीने अनेकांचे व्‍यवसाय बंदच

पुढारी वृत्तसेवा

वाशी : जिल्ह्यासह करवीर तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) भेसळखोर आणि बेकायदेशीर गुटखा विक्रेत्यांविरोधात व्यापक मोहिमेचा सपाटा लावला आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी टाकलेल्या धाडींमध्ये तब्बल २६ लाख रुपये किमतीचे १६ हजार ३२१ किलो भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले. यासोबतच बंदीस असलेला १० लाख ५० हजार रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला आहे. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, अनेक व्यवसायिकांनी कारवाईच्या भीतीने आपली दुकाने व उत्पादन केंद्रे बंद ठेवली आहेत.

अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण २६६ खाद्यपदार्थांची कसून तपासणी केली. त्यापैकी संशयास्पद वाटणारे १६१ नमुने पुढील प्रयोगशाळा तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या अन्नपदार्थांमध्ये प्रामुख्याने तेल, तांदूळ, खवा, रबडी, मिल्क पावडर, बासुंदी आणि गूळ यांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान नियमबाह्य व भेसळयुक्त पदार्थ विक्री करणाऱ्या २१ जप्तीच्या घटनांमध्ये लहान ७० व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उत्पादन केंद्रासह पानटपऱ्यांवर छापे

या मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने एका प्रमुख उत्पादन केंद्रावर छापा टाकला. तेथे मावा, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा भेसळयुक्त पदार्थांचा मोठा साठा आढळून आला. याशिवाय जिल्ह्यातील विविध दुकाने आणि पानटपऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधी सुपारी आणि सुगंधी पानमसाला असा एकूण १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चोरून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त उदय लोहकरे, दयानंद शिर्के, प्रदीपा फावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते, उमेश भुसे, विश्वजित गुजर, निकिता ढाले, दिनेश हगवणे, पांडुरंग घुगे, श्रद्धा साळुंखे आणि प्रतीक्षा रांधवन यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

दै. ‘पुढारी'चे विशेष आभार

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अन्नपदार्थांमधील भेसळ आणि गुटखा विक्रीकडे दै. ‘पुढारी'ने प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या गंभीर प्रकारावर सडकून टीका करत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली होती. हे वृत्त प्रसिद्ध होताच अन्न व औषध प्रशासनाने तत्परतेने पावले उचलत करवीर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात धाडींचे सत्र सुरू केले. दै. ‘पुढारी'ने दाखवलेल्या या सामाजिक जागरूकतेमुळेच ही मोठी कारवाई शक्य झाल्याची भावना व्यक्त होत असून, कोल्हापूर जिल्हा आणि करवीर तालुक्यातून दै. ‘पुढारी'चे विशेष आभार मानले जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT