Fake Paneer 
कोल्हापूर

Kolhapur Adulterated Food : पनीर मसाला टिक्कामध्‍ये आहे का पनीर एक तरी टक्का?

पनीरच्‍या नावाखाली पोटात जातोय बटाटा, स्किम मिल्क पावडर, स्टार्च, व्हे पावडर, पामतेल, मैद्याचा लगदा; राज्यात पनीरमधील भेसळ भयावह पातळीवर

पुढारी वृत्तसेवा

सुनील कदम

कोल्हापूर : राज्यात काही नामवंत कंपन्या आणि काही प्रतिथयश स्थानिक उत्पादक सोडले, तर भेसळीच्या आणि बनावट पनीरचा नुसता रतीब सुरू आहे. या भेसळीच्या पनीरला ॲनालॉग पनीर म्‍हटले जाते. या बनावट पनीरमुळे नागरिकांच्या आरोग्याचे मात्र नुसते दही होताना दिसतेय!

गाय किंवा म्हशीच्या दुधापासून पनीर बनवले जाते. साधारणत:, १ किलो पनीर तयार करण्यासाठी ५ लिटर दूध लागते. स्थानिक बाजारभावानुसार या दुधाचीच किंमत होते ३०० ते ३५० रुपये. त्यामुळे खऱ्या, स्वच्छ आणि शुद्ध पनीरच्या किमती ४०० रुपये किलोपासून पुढे सुरू होतात, पनीरचे अनेक नामवंत ब्रँड सध्या बाजारात आहेत.

पनीरमधील भेसळ

शुद्ध पनीरच्या किमती जास्त असल्यामुळेच गेल्या काही वर्षांत पनीरला मोठ्या प्रमाणात भेसळीची लागण झालेली आहे. बहुतांश टपऱ्या, धाबे आणि हॉटेल्समध्ये अगदी नाममात्र किमतीत पनीर मसाला, पनीर मसाला टिक्का, पनीर बुर्जी असे पनीरचे शेकडो पदार्थ उपलब्ध असलेले दिसतात; पण बहुतांश ग्राहकांना खरे पनीर आणि बनावट किंवा भेसळीचे पनीर यातला फरकच माहीत नसतो. त्यामुळे खवय्ये अगदी मिटक्या मारत ताव मारताना दिसतात. पनीरच्या नावावर आपण भलतेच काही खातोय याचे यांना भानही नसते.

कसे बनते ॲनालॉग पनीर?

भेसळीचे पनीर हे प्रामुख्याने भेसळीचे किंवा बनावट दूध, बटाटा किंवा मक्यापासून तयार होणारा स्टार्च, स्किम मिल्क पावडर, व्हे पावडर, पामतेल, मैदा, कृत्रिम रंग याचा वापर करून केलेले असते. आता पनीरच्या नावाखाली हा असला लगदा जर शरीरात जात असेल, तर पोटाची आणि एकूणच आरोग्याची काय अवस्था होत असेल याचा अंदाज येण्यास हरकत नाही. काही नामवंत हॉटेल्स सोडली, तर बहुतांश हॉटेल्समध्ये पनीरच्या नावाखाली हा असला लगदाच मिळतो. त्याच्या प्रतिकिलो किमतीही १५० ते २५० रुपयांच्या घरात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT