पेठवडगाव : गणेशोत्सवासाठी पुणे-मुंबईहून कोकणात गेलेले चाकरमानी गणेश विसर्जनानंतर परतीच्या प्रवासाला लागल्याने महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाच दिवसांपूर्वी अपडेट केलेले टोलचे नवीन सॉफ्टवेअर संथगतीने चालत असल्याने ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला वेळ लागत आहे. परिणामी किणी टोल नाक्यावर वाहनांच्या सुमारे पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याने वाहतूक कोंडी झाली.
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात टोलसवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणारी हजारो वाहने महामार्गावरून परतत आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या व परतणाऱ्या वाहनांची वाढलेली संख्या आणि टोल नाक्यावरील संथ ‘फास्टॅग’ प्रक्रिया यामुळे किणी तसेच तासवडे टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
किणी टोल नाक्यावर सकाळपासूनच वाहनांची संख्या अचानक वाढली. नवीन सॉफ्टवेअरमुळे ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागत असल्याने प्रत्येक वाहनाला टोल नाक्यावरून मार्गस्थ होण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे किणी टोल नाक्यावर सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेली वाहने चिपळूणहून पाटण-कराडमार्गे, रत्नागिरी व राजापूरहून आंबा घाटातून मलकापूर-वारणानगर-किणीमार्गे, देवगड-कणकवलीहून करूळ घाटातून गगनबावडा-कोल्हापूरमार्गे, तर उत्तर कर्नाटक, गोवा, कुडाळ, मालवण व सावंतवाडीहून आजरा-आंबोलीमार्गे पुणे-मुंबईकडे परतत आहेत. त्यामुळे या मार्गांवरही वाहनांची वर्दळ वाढली आहे.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या तसेच विसर्जनानंतर परतणाऱ्या कार, जीप यांसारख्या वाहनांना टोलसवलत देण्यात आली आहे. ही सवलत २७ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. त्यासाठी पोलीस व प्रादेशिक परिवहन विभागामार्फत ‘गणेशोत्सव-कोकण दर्शन’ असे स्टिकर उपलब्ध करून देण्यात आले होते. एसटी बसेसनाही टोलसवलत लागू करण्यात आली आहे.
“सकाळपासून अचानक वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यातच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाच दिवसांपूर्वी अपडेट केलेले सॉफ्टवेअर संथगतीने चालत असल्याने ‘फास्टॅग’ स्कॅनिंगला वेळ लागत आहे. त्यामुळे टोलवर मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र, आठही बूथमधून वाहने सोडण्यात येत असल्याने वाहनधारकांना शक्य तितक्या लवकर मार्गस्थ करण्याचा प्रयत्न सुरू आहे,”अंशुल शर्मा : किणी टोल नाका व्यवस्थापक