शेखर जाधव
तुरंबे : काळम्मावाडी येथील दूधगंगा धरणात केवळ 1.69 टीएमसी म्हणजे सुमारे 7 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून मागील वर्षी याच दिवशी धरणात 3.83 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा वळीव पावसाने हुलकावणी दिल्याने पाणीसंकट अधिक तीव होण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे शेवटचे आवर्तन सुरू असून, डाव्या कालव्यातील आवर्तन बंद करण्यात आले आहे. पाणीसाठ्यात वाढ झाली नाही तर दोन्ही कालव्यांमधून सिंचनासाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. सध्या प्रचंड उष्णतेमुळे शेती पिकांसाठी पाण्याची मागणी वाढली आहे. मात्र मर्यादित पाणीसाठा लक्षात घेता अधिकाऱ्यांसमोर नियोजनाचे मोठे आव्हान आहे. पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात येण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.