शित्तूर वारूण येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू 
कोल्हापूर

Kolhapur News : शित्तूर वारूण येथे गव्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : गव्याने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) येथील शेतकरी यशवंत मारुती यादव (वय 75) यांचा मृत्यू झाला. शिराळे मळा येथे मंगळवारी ही घटना घडली. भागातील ही चौथी घटना आहे, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी वर्गातून भीतीचे वातावरण आहे.

याबाबतची माहिती अशी, सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास यादव हे आपल्या मालकीच्या शिराळे मळा या शेतात गुरांना वैरण काढण्यासाठी गेले होते. उसाच्या शेतात वैरण काढत असताना अचानक बेफामपणे पळत आलेल्या गव्यानेे यादव यांना शेतातच शिंगावर घेऊन खाली आपटले. जमिनीस घुसळल्याने शिंग लागून पोट फाटले. डोक्यालाही दुखापत झाली. शेजारच्या शेतात वैरण काढणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडा-ओरडा केला असता गव्याने पळ काढला.

गंभीर जखमी अवस्थेत यादव यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शित्तूर-वारुण येथे आणले. प्राथमिक उपचार करून कृष्णा हॉस्पिटल कराड येथे नेण्यात येत असताना वाटेतच शेडगेवाडीच्या आसपास त्यांची प्राणज्योत मालवली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT