कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार ठराव दाखल झालेल्या संस्थांच्या सुनावणीत अध्यक्ष, सचिव आणि संचालक यांच्यातील मतभेद पुन्हा उघड झाले. मंगळवारी १४ संस्थांच्या सुनावणीत अनेक ठिकाणी अध्यक्ष विरुद्ध संचालक असे दोन गट आमने-सामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही संस्थांच्या सुनावणीदरम्यान अध्यक्ष व संचालक यांच्यात खटकेही उडाले.
दुबार ठराव दाखल झालेल्या एकूण ५६ संस्थांपैकी आतापर्यंत ४४ संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून, उर्वरित १२ संस्थांची सुनावणी गुरुवारी (दि. १६) होणार आहे. ताराबाई पार्क येथील दुग्ध विभागाच्या कार्यालयात दिवसभर ही सुनावणी पार पडली. शाहूवाडी व आजरा तालुक्यातील दोन संस्थांच्या प्रकरणात दोन वेगवेगळे ठराव होते. मात्र, संस्थेच्या अधिकृत इतिवृत्तात एका ठरावाचीच नोंद असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे इतिवृत्तात नोंद ठरावालाच ग्राह्य धरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगळवारी झालेल्या १४ संस्थांच्या सुनावणीत आजरा तालुक्यातील चार, करवीरमधील तीन, चंदगडमधील दोन तसेच कागल, गडहिंग्लज, पन्हाळा, भुदरगड आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी एका संस्थेचा समावेश होता.