कंपनीचे मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला Pudhari Photo
कोल्हापूर

Kolhapur News | रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा काम बंद पाडू

बीडशेड येथील बैठकीत परिसरातील नागरिकांचा इशारा, तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे प्रोजेक्ट मॅनेजरचे आश्वासन

पुढारी वृत्तसेवा

शिरोली दुमाला : कोल्हापूर - बालिंगा ते दाजीपूर राज्यमार्गासाठी रस्त्याची कामे रेंगाळत चालल्यामुळे या मार्गावरील प्रवाशी, ग्रामस्थ व वाहनचालकाना प्रचंड त्रास व अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सदर कंपनीचे मनमानी पद्धतीने काम सुरू असल्याच्या संतप्त भावना व्यक्त करत रस्त्याची अपुरी कामे तात्काळ पूर्ण करा, अन्यथा काम बंद पाडू, असा इशारा या परिसरातील नागरिकांनी दिला. यावेळी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र बिर्ला यांनी तीन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

बीडशेड (ता. करवीर ) येथे सदर रस्ते कामासंदर्भात परिसरातील ग्रामस्थ व रचना कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांच्यात भर चौकात बैठक पार पडली. यावेळी बैठकीचे निमंत्रक यशवंत बँक संचालक नंदकुमार पाटील म्हणाले, रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे नागरिक वैतागून गेले आहेत. यापुढे दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करा. येत्या पंधरा दिवसात पुन्हा कामाचा आढावा घेण्यासाठी राज्य महामार्ग एमएसआयडीचे टीम लीडर प्रदीप तिवारी यांच्यासोबत बैठक होईल असे सांगितले.

चर्चेदरम्यान कुंभी कारखान्याचे संचालक दादासाहेब लाड, वीरशैव बँक संचालक अनिल सोलापुरे, एस.के.पाटील, माधव पाटील, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.के.एन. पाटील, गजानन खोत, डी. के. खाडे, दुकानदार कृष्णात माने आदींनी परखड मते मांडली. यावेळी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर रवींद्र बिर्ला यांनी ग्रामपंचायत व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊ, पावसामुळे कामास विलंब होत आहे. येत्या तीन महिन्यांत सर्व अपुरी कामे पूर्ण केली जातील अशी ग्वाही दिली.

बैठकीस उपसरपंच कृष्णात पाटील, विलास पाटील, यशवंत पाटील, रंगराव पाटील, संजय पाटील, पप्पू पाटील, सचिन पानारी, बीडशेड बाजारपेठेचे दुकानदार आदीसह या परिसरातील पदाधिकारी, ग्रामस्थ, वाहनचालक उपस्थित होते.

' दै.पुढारी ' चे आभार..

बालिंगा - दाजीपूर रस्त्याचे काम गेल्या आठ - नऊ महिन्यापासून सुरू आहे. अपुरी व अनियमित कामे यामुळे ग्रामपंचायत, ग्रामस्थ, शेतकरी, वाहनचालक यांना अनेक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. याबाबत दै. ' पुढारी ' ने सातत्याने आवाज उठवून पाठपुरावा सुरू ठेवल्याबद्दल, येथील नागरिकांच्या आवाजाला व वेळोवेळी होणाऱ्या आंदोलनाला बळ दिल्याबद्दल उपस्थितांनी दै.' पुढारी' चे आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT