शतकापूर्वीचा राधानगरी-दाजीपूर जुना मार्ग खुला 
कोल्हापूर

Kolhapur News : शतकापूर्वीचा राधानगरी-दाजीपूर जुना मार्ग खुला

राधानगरी जलाशयातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याखालचा इतिहास पुन्हा जिवंत

पुढारी वृत्तसेवा

नंदकुमार गुरव

राधानगरी : राधानगरी धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने अनेक दशकांपासून जलमय असलेला जुना राधानगरी-दाजीपूर मार्ग पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. पाण्याखाली दडलेले ब्रिटिशकालीन दगडी पूल, मोर्‍या, जुना रस्ता तसेच विस्थापित गावांचे भग्नावशेष पुन्हा दिसू लागल्याने इतिहासप्रेमी, पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमध्ये या ऐतिहासिक वारशाविषयी उत्सुकता वाढली आहे.

दाजीपूर परिसरात राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वर्षातील बहुतांश काळ पाण्याखाली दडलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल हा छोटेखानी; पण अत्यंत मजबूत पाषाणपूल वर्षानुवर्षे धरणातील पाण्याचा मारा सहन करत आजही ताठ उभा आहे. पाणीसाठा कमी होताच हा पूल पुन्हा दर्शनास येतो आणि तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देतो. संस्थान काळात राधानगरीमार्गे दाजीपूरहून तळकोकणात जाणारा हा महत्त्वाचा मार्ग होता. या मार्गावर ब्रिटिशांनी दगड, चुना आणि शिसे वापरून तीन मजबूत दगडी पूल, चार मोर्‍या आणि भक्कम रस्ता उभारला होता. आजही या बांधकामाची गुणवत्ता पाहून अभियंत्यांच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.

१९५७ मध्ये धरण पूर्ण क्षमतेने भरू लागल्यानंतर जुना राधानगरी-दाजीपूर मार्ग कायमस्वरूपी पाण्याखाली गेला. धरणामुळे तत्कालीन करंजे, एजिवडे, मांडरेवाडी आणि कारीवडे ही गावे जलमय झाली. उन्हाळ्यात पाणी पातळी खालावल्यानंतर या गावांचे घरांचे पाया, दगडी भिंती, रस्ते आणि इतर अवशेष पुन्हा उघडकीस येतात. त्यातून त्या काळातील लोकांनी दिलेल्या त्यागाची जाणीव आजही होते.

हसणे गावाशेजारील मोठ्या दगडी पुलाच्या बांधकामापूर्वी वापरात असलेला पाण्याखालील हा जुना पूलही यावेळी स्पष्टपणे दिसत आहे. धरण बांधकामाच्या काळात किंवा त्यापूर्वी उभारण्यात आलेला हा पूल असल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे. रस्ता आजही सुस्थितीत आहे. जांभा दगड, चुना आणि शिसे वापरून करण्यात आलेल्या मजबूत बांधकामाची गुणवत्ता यातून अधोरेखित होते. धरणाची पातृछायाचित्रकार आणि पर्यटकांची गर्दी होत असून राजर्षी शाहू महाराजांची दूरदृष्टी, ब्रिटिशकालीन अभियांत्रिकी आणि विस्थापित गावांचा इतिहास जपणारा हा वारसा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT