कोल्हापूर

Kolhapur News |बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील काँक्रिट रस्त्याच्या बाजूपट्टीवर चक्क तांबड्या मातीचा भराव : कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित, पावसाळ्या रस्त्‍याकडेला होणार चिखलाचे साम्राज्य, वाहनधारकांना चिंता

पुढारी वृत्तसेवा

शिरोली दुमाला : बालिंगा–दाजीपूर राज्यमार्गावरील शिरोली दुमाला ता. करवीर येथील अलीकडेच काँक्रिटिकरण केलेल्या रस्त्याच्या बाजूपट्टीवर दर्जेदार मुरुमाऐवजी थेट तांबडी माती टाकली जात आहे. बाजूपट्टीवर मातीचा भराव टाकल्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पावसाळ्यात या मातीची धूप होऊन रस्त्याच्या कडेला चिखल होणे, खड्डे पडण्याची तसेच अपघाताचा धोका वाढण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

राज्यमार्गाच्या रस्ते कामाला सुरुवात होऊन आता वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हापासून आतापर्यंत रस्तेकामाच्या संदर्भात अनेकवेळा स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, संघटना यांच्याशी वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. अनेकदा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर कामाला गती व नियमितपणा आल्याचे दिसून आले.

सावरवाडी - शिरोली दुमाला - सावर्डे दुमाला - आरळे - घानवडे ते पुढील गावे असा एकेरी बाजूने काँक्रीटीकरण तसेच सावरवाडी ते सावर्डे दुमाला पूर्ण रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरु आहे. मुख्य रस्ता काँक्रिटचा असला तरी दोन्ही बाजूंना आवश्यक असलेली मजबूत बाजूपट्टी, योग्य कॉम्पॅक्शन आणि पाण्याचा निचरा याकडे दुर्लक्ष होत असल्याच्या स्थानिक लोकांच्या तक्रारी आहेत.

काँक्रिट रस्ता मजबूत असला तरी बाजूपट्टी कमकुवत असेल तर वाहन बाजूला घेताना घसरण्याची शक्यता वाढते. काँक्रिट रस्त्यांच्या कडेला पक्का मुरुम वापरून व्यवस्थित दाबणी (कॉम्पॅक्शन) करणे आवश्यक असते. फक्त माती टाकल्यास पावसाळ्यात ती वाहून जाऊन रस्त्याच्या कडेला पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे रस्त्याच्या कडेला क्रॅक पडणे, कडा खचणे किंवा वाहनांचे टायर घसरणे यांसारखे प्रकार संभवतात. त्यामुळे संबंधित कॅन्स्ट्रक्शन कंपनी, संबंधित प्रशासन विभागाने याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.

बालिंगा - दाजीपूर मार्ग करवीर पश्चिम भागाच्या विकासाला गती देणारा असला तरी या मार्गाच्या कामाबाबत सतत शंका निर्माण होत आहेत.रस्त्याच्या बाजूला टाकला जाणारा भराव निव्वळ तांबडी माती असून हा भराव मुरूम असणे गरजेचे आहे. रस्त्याचा दर्जा व भरावाबाबत सर्वांचे दुर्लक्ष आहे याचे आश्चर्य वाटते. संबंधित अधिकारी,लोकप्रतिनिधींनी या कामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
विनायक देसाई, गर्जन (सामाजिक कार्यकर्ते).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT