कोल्हापूर : अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्राच्या पूरक आणि मूलभूत सेवा-सुविधांच्या निर्मितीसाठी तसेच अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण व विकास करण्यासाठी हा ७९० कोटी ६८ लाखांचा निधी मैलाचा दगड ठरणार आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेतून हा निधी मिळाल्यास कोल्हापूर हे केवळ धार्मिक पर्यटनाचे केंद्र न राहता एक जागतिक दर्जाचे सुसज्ज पर्यटन शहर म्हणून नावारूपास येणार आहे.
कोल्हापुरातील वाढती वाहनसंख्या आणि अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही एक मोठी समस्या बनली आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रस्तावात १३९ कोटी ५३ लाख रुपयांची विशेष तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून शहरात विविध ठिकाणी ग्रेडसेपरेटर, आधुनिक उड्डाणपूल आणि अंडरपास (भुयारी मार्ग) उभारले जाणार आहेत. यामुळे भाविकांच्या गाड्या थेट पार्किंग क्षेत्रापर्यंत पोहोचू शकतील आणि स्थानिक नागरिकांनाही वाहतूक कोंडीतून मोठी सुटका मिळेल.
कोल्हापुरात दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येतात. या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी १८० कोटी ८६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये प्रसाधनगृहे, विश्रामगृहे, माहिती केंद्रे आणि डिजिटल सुविधांचा समावेश असेल. तसेच शहरात येणाऱ्या पर्यटकांचे भव्य स्वागत करण्यासाठी आणि त्यांना एकाच छताखाली सर्व प्राथमिक माहिती व सुविधा देण्यासाठी १२० कोटी रुपये खर्चून एक अत्याधुनिक ‘प्रवेश संकुल’ उभारण्यात येणार आहे.
शाहू क्लॉथ मार्केट परिसराचा कायापालट होणार
भाविकांची जेवणाची सोय व्हावी यासाठी भव्य ‘प्रसादालय’ आणि वाहनांच्या शिस्तबद्ध पार्किंगसाठी ‘वाहनतळ’ सुविधा विकसित केली जाणार आहे. यासाठी ८९ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे शहरातील शाहू क्लॉथ मार्केट परिसराचाही या योजनेअंतर्गत कायापालट केला जाणार आहे.