कोल्हापूर : कोल्हापूर शहरात दोन दिवसांपूर्वी तीव्र पाणी टंचाई होती. नागरिक रस्त्यावर उतरले होते. महापालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करून पाणीपुरवठा सुरळीत केला. लोकांना पाणी मिळाले नसल्याने सलग चार दिवस पाणी दिले. मात्र, सोमवारपासून (दि. २२) पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दि. १९ व २० जून रोजी दौऱ्यावर होते, त्या पार्श्वभूमीवर शहरात पाण्यावरून तणावाची स्थिती नको म्हणून पाणीपुरवठा सुरळीत केला. आता गृहमंत्री शहा यांचा दौरा संपल्याने पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
महापालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्याने काळम्मावाडी धरणातील पाणीपातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. धरणातून थेट पाईपलाईन योजनेद्वारे होणारा पाणी उपसा अत्यंत कमी झाला आहे. परिणामी, काळम्मावाडी योजनेतून शहराला नियमित पाणीपुरवठा करणे शक्य नाही. त्यामुळे कोल्हापूर शहर व उपनगरांत सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याचे नियोजन केले आहे.
महापालिकेकडून शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पर्यायी पाणी उपसा सुरू करण्यात आला आहे. आगामी पावसाची शक्यता व पंचगंगा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन या केंद्रांच्या क्षमतेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. चंबुखडी, पुईखडी व कसबा बावडा फिल्टर हाऊसवरून वितरीत होणाऱ्या विविध भागांमध्ये सोमवारी (दि. २२) व मंगळवार (दि. २३) पासून दिवसाआड पाणीपुरवठा होईल. उपलब्ध पाणी काटकसरीने वापरून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.