कोल्हापूर : महावितरणच्या राधानगरी उपविभागाकडून शिरगाव शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या येळवडे (ता. राधानगरी) गावात एकाच दिवशी वीजचोरीविरोधात मोहीम राबवून तपासणी करण्यात आली. या सर्जिकल स्ट्राईकमध्ये १६ वीजग्राहकांकडे वीजचोरी आढळून आली असून, त्यांनी एकूण ४ लाख ३४ हजार ५५३ रुपयांची वीजचोरी केली आहे. संबंधित ग्राहकांनी वीजचोरीची रक्कम दंडासह भरली नाही, तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
महावितरणच्या राधानगरी उपविभागांतर्गत शिरगाव शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील येळवडे गावात महावितरणच्या पथकाने वीजचोरीविरोधात विशेष धडक मोहीम राबवली. या कारवाईत विद्युत कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत वीजचोरीची १४ प्रकरणे उघडकीस आली असून, ग्राहकांनी एकूण १६,८०६ युनिट्सची वीजचोरी केली आहे. याची दंडासह एकत्रित रक्कम ३ लाख ९७ हजार ५५३ रुपये इतकी होते; तर कलम १२६ अंतर्गत वीजचोरीची २ प्रकरणे आढळून आली असून, त्यांच्या वीजचोरीची एकत्रित रक्कम ३७ हजार रुपये इतकी होते. एकाच गावात एकूण १६ प्रकरणे निष्पन्न झाल्याने आणि महावितरणने केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरातील वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणने कारवाई केलेल्या ग्राहकांमध्ये आनंदा रामचंद्र पाटील, तुकाराम गणपती सार्वेकर, सर्जेराव ज्ञानदेव शिंदे, दशरथ नावबा पाटील, गोपाळ नाना राबाडे, गणपती भाऊ पाटील, ज्ञानदेव रामचंद्र पाटील, मारुती लक्ष्मण राबाडे, नारायण रामचंद्र पाटील, संजय नारायण पाटील, आनंदा ज्ञानू मुसळे, धनाजी यशवंत पाटील, नारायण धोंडी पाटील, गोपाळ कृष्णा मिसाळ, सोनाबाई वसंत भाट या वीजग्राहकांचा समावेश आहे. या कारवाईत शिरगाव शाखेचे अभियंता रोहित कोळी, स्वरूप गुरव (तारळे), प्रमोद पाटील (आवळी), प्रधान तंत्रज्ञ युवराज चौगुले व जनमित्रांनी विशेष परिश्रम घेतले.
सामाजिक बदनामी व कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी वीजग्राहकांनी अधिकृत वीजजोडणी घेऊनच वीज वापरणे त्यांच्या हिताचे आहे. वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम अशीच सुरू राहील, असा इशारा कोल्हापूर मंडलाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिला आहे.