कोल्हापूर

Kolhapur News : आमच्या जीवापेक्षा वनकायदे श्रेष्ठ आहेत का? तळीचा धनगरवाडा ग्रामस्थांची कैफियत

मोहन कारंडे

सरूड; पुढारी वृत्तसेवा : शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ वारूण पैकी तळीचा धनगरवाडा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सारीका गावडे या मुलीच्या कुटुंबियांची माजी खा. राजू शेट्टी यांनी मंगळवारी दुपारी सांत्वनपर भेट घेतली. मुलीच्या वियोगाने खचलेल्या आई-वडीलांना धीर देत मानसिक आधार दिला. यावेळी 'आमच्या जीवापेक्षा वनकायदे श्रेष्ठ का बरं ठरत आहेत?' असा स्थानिक गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला. शिवाय प्रत्येक बऱ्यावाईट घटनेनंतर पाहणीसाठी येणारे वनविभागाचे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी हे नेमके देखरेखीसाठी येतात की पर्यटनासाठी? हे त्यांना विचारा, असा वनविभागाच्या बेजबाबदार कामकाजाबाबत शेट्टींपुढे ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला, तितकाच संतापही व्यक्त केला.

एकीकडे वन्यजीवांबरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करा, असा प्रत्येक घटनेच्या अनुषंगाने सल्ला देणाऱ्या वनविभागाच्या वस्ताद यंत्रणेकडून दुसऱ्या बाजूने बाहेरून पकडून आणलेले बिबट्यासारखे हिंस्र वन्यप्राणी या जंगल परिसरात आणून सोडले जात आहेत. अशी खात्रीशीर माहिती देत या ग्रामस्थांनी जगण्या-मरण्याची पोटतिडकीने कैफियत मांडली.

जंगलवासी म्हणून आमच्या अनेक पिढ्या इथे खपल्या. नजरे समोरून जाणारे वन्यप्राणी कधीही हल्ला करीत नव्हते, असा अनुभव सांगत अलीकडे मात्र बिबट्यांची दहशत वाढल्याने आम्ही जगायचं तरी कसं? असा सवाल विचारणाऱ्या सामान्य ग्रामस्थांनी शेट्टींसमोर जीवन लढ्याची व्यथाच विशद केली. यावेळी बाळू कांबळे, राजू पाटील-रेठरेकर आदी उपस्थित होते.

अत्याधुनिक ड्रोन, तरीही बिबट्याची शोधमोहीम अयशस्वी

दरम्यान, शाळकरी मुलीचा जीव घेणाऱ्या त्या बिबट्याची जवळच्या जंगलात ड्रोनद्वारे शोध मोहीम सुरू असून राजू शेट्टी यांनी या मोहिमेतील वन कर्मचाऱ्यांच्या पथकाची भेट घेतली. यावेळी जंगल परिसराची त्यांनी माहिती घेतली. अत्याधुनिक ड्रोनची एकाचवेळी १६ किलोमीटर क्षेत्र ट्रॅप (स्कॅन) करण्याची क्षमता आहे. रात्रीच्या मोहिमेत गवे, रानडुकरे असे अनेक प्राणी कॅमेऱ्यात ट्रॅप झालेले दिसले. परंतु लहानमोठी झाडे-झुडपे, चर तसेच दगडधोंड्यांमुळे हल्लेखोर बिबट्या मात्र दृष्टिपथात येत नसल्याचे वन कर्मचाऱ्यांनी शेट्टींना माहितीदाखल सांगितले.

SCROLL FOR NEXT