कोल्हापूर

Kolhapur News: संजय मंडलिक यांच्या हाती कमळ की धनुष्यबाण?

मोनिका क्षीरसागर

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ लढविण्याबाबत भाजप उत्सुक आहे. बदलत्या राजकारणात बदललेली समिकरणे विचारात घेऊन कागल, राधानगरी, भुदरगड, आजरा व चंदगड या मतदारसंघातील लोकप्रतिनीधींचे सहाय्य आणि कोल्हापूर उत्तर तसेच दक्षिण मतदार संघातील भाजपची मते याच्या आधारे भाजपचे स्थानिक नेते याबाबत तयारी करत आहेत. विशेषतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौर्‍यानंतर पक्षाची यंत्रणा गतिमान झाली आहे. विद्यमान खासदार संजय मंडलिक कमळ हाती घेणार की भाजप नवा चेहरा रिंगणात उतरवणार हे अद्याप ठरलेले नाही. महाशक्ती विरोधात महाविकास आघाडी अशा लढतीत भाजपला कमळ फुलवायचे आहे. त्यासाठी सर्व ती ताकद वापरून भाजप आखाड्यात उतरणार आहे.

खरे तर कोल्हापूर मतदार संघात भाजपची ताकद जेमतेमच, पण बदलेल्या राजकारणाच्या समिकरणात भाजपला संधी मिळेल, असे नेत्यांना वाटते. त्याहीपेक्षा कोल्हापुरात आता कमळच असा ध्यास घेऊन लढले पाहिजे, असा नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आता नाही तर कधीच नाही अशा नेटाने भाजप ही निवडणूक लढवणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी सुरू आहे. अलिकडेच झालेल्या बावनकुळे यांच्या दौर्‍यात त्याचे सुतोवाच करण्यात आले. एवढेच नाही तर संभाव्य उमेदवार, त्यांची तयारी, भाजपची कमतरता कुठे आहे, तेथे पक्ष कशा पद्धतीने उभारता येईल, या सार्‍या जमेच्या व उणीवांच्या बाजूंवर साधक – बाधक चर्चा करण्यात आली आणि यातूनच भाजपने निवडणूक लढविण्याचा फॉर्म्युला पुढे आणला आहे.

बदललेल्या राजकारणाचा संदर्भ घेऊन महाशक्तीची वाढलेली ताकद आणि वाढलेली मते लोकसभेसाठी भाजपच्या पारड्यात कशी पडतील, या द़ृष्टीने विचार करण्यात आला. कोल्हापूर उत्तरमध्ये पोटनिवडणुकीत भाजपला पडलेली 78 हजार 25 मते, कोल्हापूर दक्षिणमध्ये भाजपला 2014 साली मिळालेला विजय आणि 2019 च्या निवडणुकीत मिळालेली 97 हजार 394 मते, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांनी महायुतीमध्ये केलेला प्रवेश, राधानगरीमध्ये शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांचा शिंदे गटाला असलेला पाठिंबा या सार्‍यावर भाजपची मदार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, कागल, चंदगड व राधानगरी या विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो. तेथे राजकीय परिस्थितीचा विचार करता विधानसभेतील बलाबल समसमान आहे. उत्तर, दक्षिण व करवीरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. कागल, चंदगड राष्ट्रवादी अजित पवार गट व राधानगरी शिवसेना शिंदे गट अशी राजकीय परिस्थिती आहे.
2019 च्या निवडणुकीत कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचे चंद्रकांत जाधव 91 हजार 53 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी तत्कालीन शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला. क्षीरसागर यांना 75 हजार 854 मते मिळाली होती.

सध्या ते शिवसेना शिंदे गटात आहेत. दक्षिणमधून काँग्रेसचे ॠतुराज पाटील 1 लाख 40 हजार 103 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपचे तत्कालिन आमदार अमल महाडिक यांचा पराभव केला. महाडिक यांना 97 हजार 394 मते मिळाली होती. करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील 1 लाख 35 हजार 675 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे तत्कालिन आमदार चंद्रदीप नरके यांचा पराभव केला. नरके यांना 1 लाख 13 हजार 14 मते मिळाली होती. चंद्रदीप नरके सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत.

कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ 1 लाख 16 हजार 436 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी भाजपकडून इच्छुक असलेले मात्र स्वतंत्रपणे आखाड्यात उतरलेले समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. घाटगे यांना 88 हजार 303 मते मिळाली होती. समरजितसिंह घाटगे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. चंदगडमधून राष्ट्रवादीचे राजेश पाटील 55 हजार 588 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे संग्राम कुपेकर यांचा पराभव केला. कुपेकर यांना 33 हजार 215 मते मिळाली होती. राजेश पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. राधानगरीतून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर 1 लाख 5 हजार 881 मते घेऊन विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे के. पी. पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना 87 हजार 451 मते मिळाली होती. पाटील सध्या अजित पवार गटात आहेत.

चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने 2022 साली झालेल्या कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत जयश्री चंद्रकांत जाधव या 97 हजार 332 मते घेऊन विजयी झाल्या. ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली होती. भाजपकडून सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली, त्यांना 78 हजार 25 मते मिळाली. भाजपला मिळालेली मते ही विरोधकांनाही धडकी भरवणारी ठरली. तेथूनच कोल्हापुरात कमळ फुलवायचेच हा विचार पुढे आला. आता त्या द़ृष्टीनेच पावले पडत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT