गडहिंग्लज : सुट्टीवर आलेला सैन्य दलातील जवान अमर भीमगोंडा देसाई (रा. नूल, ता. गडहिंग्लज) यांना हात-पाय व डोळे बांधून प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच विषारी द्रव पाजले होते. पुण्यातील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा ५ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. यातील प्रियकर सचिन राऊत यानेही विषारी द्रव पिऊन जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटकामध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती गडहिंग्लजचे पोलिस निरीक्षक गजानन सरगर यांनी दिली.
राऊत याचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. यामध्ये तेजस्विनी देसाई व सचिन राऊतवर खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. आता राऊत याचा मृत्यू झाल्याने तेजस्विनी हिच्यावर याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू राहणार आहे. तेजस्विनी ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.