कोल्हापूर : नव तंत्रज्ञान आणि एआयचा वापर करून उदयाला येत असलेल्या स्टार्टअप्सचा जगभरात बोलबाला सुरू आहे. या विश्वात कोल्हापूरचाही डंका वाजत आहे. उसाचे उत्पादन 20 टनांनी वाढविणारे बायोफर्टिलायझर, यांत्रिकी ऊस लागवड यंत्र, सीमा सुरक्षेसाठीची विमाने, अनेक आजारांच्या निदानासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी तंत्रापासून ते पोश्चर करेक्शन सॅकसारखे नवनवे स्टार्टअप्स कोल्हापुरात आकाराला आले आहेत. शिवाजी विद्यापीठ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये नोंदणी झालेल्या स्टार्टअप्सची झेप 150 कोटी रुपयांवर गेली आहे.
सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असणार्या कोल्हापूरने स्टार्टअप्स क्षेत्रातही उत्तुंग भरारी घेतली आहे. कोल्हापुरातील नवउद्योजकांनी शेती, तंत्रज्ञान, पर्यावरण, ऊर्जा आणि सेवा क्षेत्रात नवकल्पकतेच्या जोरावर उभारलेल्या स्टार्टअप्समुळे रोजगाराच्या नव्या संधी देखील उपलब्ध झाल्या आहेत. काही स्टार्टअप्स आज संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या पातळीवर नाव कमावत आहेत. गेल्या तीन वर्षांत कोल्हापुरात स्टार्टअप्सची संख्या वेगाने वाढत आहे. नोंदणी झालेल्या स्टार्टअपमध्ये सुप्रिया कुसाळे यांचे बायोफर्टिलायजर हे शेतीपूरक खत आहे. नवतंत्रज्ञानाचा वापर करून विकसित करण्यात आलेले या बायोफर्टिलायजरच्या वापराने उसाचे उत्पादन 20 टनांनी वाढू शकते, असा दावा करण्यात आला आहे.
कॅफेनलेस कॉफी ही नव संकल्पना घेत स्टार्टअप तयार केला आहे. या कॉफीची चव आपल्या नेहमीच्याच कॉफीसारखी आहे पण यामध्ये हानिकारक असणार्या कॅफेनला वगळण्यात यश आले नाही. मुग्धा सावंत यांचे हे तंत्रज्ञान आहे.
शाळा असो किंवा घर बॅगमुळे किंवा बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपले पोश्चर बदलते. सिद्धी सावंत यांनी एक अशी सॅक तयार केली आहे जी तुमचा पोश्चर सुधारण्यास मदत करेल. याचा प्रोटाटाईप अंतिम टप्प्यात असून लवकरच ही बाजारात येईल.
विश्वजित खाडे यांचे आर्डिनो स्लेट, कॅफेन लेस कॉफी (मुग्धा सावंत), यांत्रिकी ऊस लागवड यंत्र (संग्राम पाटील), जैवखत (सुप्रिया कुसाळे), सांधेदुखीवर तेल (चिराग नारायणकर), कणिक मळणी मशिन (दीपक पवार), नेब्युलायझर मशिन (दिग्विजय अजरकर), अँटिबॅक्टेरिअल पेंट (डॉ. एस. डी. देळेकर), बदाम थंडाई (धनंजय वाडेकर), नवीन ऑपरेटिंग सिस्टम (एस. व्ही. कुंभार), रेशीम किड्यांपासून प्रोटिन (अभिजित घाटगे) आजार निदानासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटी (राजवर्धन शिंदे) वाहतुकीसाठीचे अॅप (अनिरुद्ध कुलकर्णी), सीमा सुरक्षेसाठी ब्लेंडेड विंग बॉडी विमाने (तुषार पुसाडकर), डिजिटल मायक्रोस्कोप (विशाल सुतार) औषध देताना होणारा त्रास कमी करणारी साधने (सोहिली पाटील), मिटिंग मॅनेजमेंट सिस्टीम सॉफ्टवेअर (विश्वजित देसाई), न्यूट्रासिटीकल फूड (डॉ. अभिनंदन पाटील), बांधकाम साहित्य वितरण सेवा (वैभव फाळके), महाविद्यालयीन शिक्षण अॅप (जमीन शहा) .