कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या शहर अभियंतापदी पुन्हा नेत्रदीप सरनोबत यांची वर्णी लागली. राज्य शासनाने 28 मार्च 2023 रोजी तडकाफडकी त्यांच्याकडून कार्यभार काढून घेऊन जल अभियंतापदावर बदली केली होती. हर्षजित घाटगे यांच्याकडे शहर अभियंतापदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. अवघ्या वर्षातच पुन्हा सरनोबत शहर अभियंता पदावर आले आहेत. नगरविकास विभागाच्या उपसचिव सुशिला पवार यांनी त्यासंदर्भात शनिवारी आदेश काढले.
कोल्हापुरातील विविध विकासकामे, प्रकल्पांची कामे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अमृत योजना टप्पा 1 व टप्पा 2 या योजनांची अंमलबजावणी करून प्रकल्प मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यासाठी सरनोबत यांच्याकडे शहर अभियंतापदाचा व अमृत योजना टप्पा 2 या योजनेचा पूर्णवेळ कार्यभार सोपवावा. तसेच रिक्त होणार्या जल अभियंता या पदाचा कार्यभार इतरांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी, असे उपसचिव पवार यांनी महापालिका प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले
आहे.
दरम्यान, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेतील आढावा बैठकीत अधिकार्यांना कामाबाबत सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर घाटगे यांच्याकडून कार्यभार काढल्याची चर्चा महापालिकेत सुरू आहे. घाटगे यांच्याकडे आता जल अभियंतापद किंवा कार्यकारी अभियंतापद सोपविण्यात येण्याची शक्यता आहे.