Kolhapur Flood Alert 
कोल्हापूर

Kolhapur Flood Alert: महापुराच्या पार्श्वभूमीवर कृष्णा-पंचगंगा संगमावर एनडीआरएफचा संयुक्त बचाव सराव

यांत्रिक बोटींसह बचाव कार्याचे प्रात्यक्षिक; पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि वजीर रेस्क्यू फोर्स यांनी कुरुंदवाड येथील कृष्णा-पंचगंगा संगम परिसरात संयुक्त बचाव सराव करून आपली सज्जता दाखवून दिली.

पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या पथकाने शिरोळ तालुक्यातील पूरधोक्याच्या गावांना भेटी देत नदीपात्राची पाहणी केली. तसेच सुरक्षित स्थलांतराचे मार्ग, नागरिकांना हलविण्याची व्यवस्था आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला.

यानंतर कृष्णा-पंचगंगा संगम परिसरात एनडीआरएफच्या आधुनिक यांत्रिक बोटी पाण्यात उतरवून प्रत्यक्ष बचाव कार्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. वेगवान प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणे, बोटींचे नियंत्रण, लाइफ जॅकेटचा प्रभावी वापर तसेच पूरस्थितीतील बचाव कार्याची संपूर्ण कार्यपद्धती जवानांनी दाखवून दिली. या सरावात स्थानिक वजीर रेस्क्यू फोर्सच्या स्वयंसेवकांनीही सक्रिय सहभाग घेतला.

पूरकाळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना तातडीने मदत पोहोचविण्यासाठी एनडीआरएफ, स्थानिक बचाव पथके आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक सक्षम करण्यात आला आहे. या संयुक्त बचाव सरावामुळे संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचे स्पष्ट झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT