शारदीय नवरात्रोत्सव म्हणजे देवीच्या नऊ रूपांची पूजा करण्याचा काळ. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापूरमध्ये मोठी गर्दी होते. पण, अंबाबाई मंदिराप्रमाणेच कोल्हापूरच्या या नऊ दुर्गा देवींनाही मोठे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. पूर्वी शहराच्या रक्षणकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या देवी आता शहराच्या मध्यभागी आहेत, पण त्यांची महती आजही कायम आहे.
चला, कोल्हापूरच्या अशाच काही प्रमुख नवदुर्गांबद्दल जाणून घेऊया.
कोल्हापुरातील बिंदू चौकात वसलेले गजलक्ष्मी देवीचे मंदिर ऐतिहासिक आणि प्राचीन मानले जाते. 'गज' म्हणजे हत्ती आणि 'लक्ष्मी' म्हणजे समृद्धीची देवी. ही देवी हत्तीवर बसलेल्या महालक्ष्मीचे रूप मानली जाते. अशी श्रद्धा आहे की, ही देवी धन, धान्य, ऐश्वर्य आणि शांती प्रदान करते. म्हणूनच, व्यापारी वर्ग या देवीला विशेषतः पूजनीय मानतो. नवरात्रीमध्ये या देवीचे मंदिर तेजोमय सजावटीने उजळून निघते. भाविक देवीला सोन्याची नाणी, फुलांचे हार आणि चुनरी अर्पण करून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
शिवाजी पेठेत पद्माराजे शाळेजवळ असलेले फिरंगाई देवीचे मंदिर कोल्हापूरकरांची रक्षणकर्ती मानली जाते. 'प्रियांगी' या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या या देवीला सौंदर्य आणि तेजाचे प्रतीक मानले जाते. 'गावकऱ्यांच्या संकटात धावून येणारी देवी' अशी या देवीची आख्यायिका आहे. अशी कथा सांगितली जाते की, एकदा एका भक्ताने संकटात असताना "फिर गं आई" अशी हाक दिली, तेव्हा देवी तिथेच थांबली. याच घटनेवरून या देवीचे नाव 'फिरंगाई' पडले.
शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकाजवळील महाकाली मंदिर खूप प्राचीन आहे. देवीचे उग्र रूप वाईट शक्तींचा नाश करणारे आणि भक्तांना संकटातून बाहेर काढणारे मानले जाते. नवरात्रीच्या काळात येथे सप्तशती पारायण, विशेष यज्ञ आणि ढोल-लेझीमच्या मिरवणुका काढल्या जातात. देवीला रक्तचंदन आणि लिंबू-माळ अर्पण करण्याची प्रथा आहे. पंचमीला देवीची मोठी पालखी निघते, तर अष्टमीला जागर केला जातो.