पेठवडगाव : नवे चावरे ते जुने चावरे मार्गावर कारवाई करत वडगाव पोलिसांनी १०५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, १० ग्रॅम गांजा, गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि विनानंबर प्लेटची कार असा २४ लाख ५४ हजार ५९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गणेश सुरेश आडेकर (२९, गणेशनगर, इचलकरंजी) आणि साद मुनीर मुल्ला (२२, शिवाजीनगर, कोरोची, इचलकरंजी) या दोघांना ताब्यात घेण्यात आले असून, निपाणीतील संशयितासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भादोले येथील तरुणाच्या अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करताना संशयित अमली पदार्थ विक्रीसाठी नवे चावरे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. साध्या वेशात पाळत ठेवणार्या पोलिसांना पहाटे विनानंबर प्लेटची कार दिसली. तपासणी केली असता त्यात १०३ ग्रॅम एमडी ड्रग्ज, १० ग्रॅम गांजा, सेवनासाठी वापरली जाणारी साधने, गावठी पिस्तूल, चार काडतुसे, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, रोख रक्कम आणि पाच मोबाईल आढळले. कारच्या डिक्कीत दोन नंबरप्लेटही सापडल्या.
प्राथमिक चौकशीत संशयितांनी निपाणीतील शंतनू चौगुले याच्याकडून विक्रीसाठी ड्रग्ज घेतल्याची माहिती दिली. जप्त पदार्थाची फॉरेन्सिक पथकाने प्राथमिक तपासणी केली असून ते मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोरख चौधर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.