कोल्हापूर : आठवड्यातून दोनवेळा धावणारी कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस सोमवार (दि. 19) पासून ‘एलएचबी’ कोचसह धावणार आहे. मंगळवारपासून कोल्हापूर-हजरत निझामुद्दीन (दिल्ली) सुपरफास्ट एक्स्प्रेस, तर शनिवार (दि. 24) पासून कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेसचाही प्रवास ‘एलएचबी’ कोचमुळे आणखी आरामदायी होणार आहे.
या तीनही गाड्या सध्या ‘आयसीएफ’ डबे (तपकीर रंगाचे) आहेत. ते आता बदलून त्याऐवजी ‘एलएचबी’ (लाल रंगाचे) डबे जोडले जाणार आहेत. ‘एलएचबी’ कोचमुळे या तीनही एक्स्प्रेसमध्ये स्लीपरचे चार डबे कमी होणार आहेत. यामुळे या तीनही गाड्या सध्या 22 डब्ब्यांसह धावतात, त्या (दि. 19) जानेवारीपासून 18 डब्यांसह धावणार आहेत.
दर मंगळवारी कोल्हापूर-दिल्ली हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस, दर शनिवारी कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस आणि दर सोमवार आणि शुक्रवार आठवड्यातून दोनवेळा कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस धावते. या तीनही एक्स्प्रेसना प्रवाशांची गर्दी आहे. या एक्स्प्रेसचे तिकीट मिळवणे म्हणजे एक प्रकारचे दिव्यच असते. यामुळे या तीनही एक्स्प्रेसची वेटिंग लिस्ट मोठी असते.
प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या तीनही गाड्या नियमित कराव्यात अथवा त्यांच्या फेर्यांत वाढ करावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे, त्यातच आता या गाड्यांचा प्रवास जरी आरामदायी होणार असला, तरी डब्यांचीच संख्या कमी होणार आहे. त्यामुळे आसन क्षमताही कमी होणार आहे. परिणामी, वेटिंग लिस्ट आणखी वाढणार आहे.