Kolhapur Leopard Sighting  
कोल्हापूर

Kolhapur Leopard Sighting : नागाव येथे बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन; नागरिकांमध्ये घबराट

वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल

पुढारी वृत्तसेवा

नागाव : हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील मुख्य रस्त्यावरून शनिवारी (दि.२४) रात्री नऊच्या सुमारास एका बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सदर प्राण्याने रस्ता पार करून पलीकडे असलेल्या कोळी यांच्या शेतात प्रवेश केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. या घटना वाऱ्यासारखी पसरताच नागाव व आसपासच्या गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या सदृश्य प्राणी मुख्य रस्त्यावरून ओढ्याच्या जवळून जात असताना काही नागरिकांना दिसून आला. हा प्राणी रस्त्याच्या पलीकडील कोळी यांच्या शेतात निघून गेल्याचे पाहताच नागरिकांची धावपळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी व उत्सुक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वन विभागाशी संपर्क साधून या घटनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन प्राण्याच्या पाऊलखुणांची पाहणी करत असून तो प्राणी बिबट्याच आहे की अन्य दुसरा प्राणी? याचा शोध घेत आहे.

वन विभागाचे नागरिकांना आवाहन

परिसरात प्राण्याचा वावर असल्याने ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विनाकारण घटनास्थळी गर्दी करू नये, जेणेकरून वन विभागाच्या शोधाशोध मोहिमेत अडथळा येणार नाही. तसेच रात्रीच्या वेळी एकटे फिरणे टाळावे व काही संशयास्पद हालचाल आढळल्यास तत्काळ वन विभाग किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT