अवधूत लोंढे, सुरज सोळांकुरे  
कोल्हापूर

Kolhapur Bribery Case : नागावमध्ये १२ हजारांची लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले

एसीबीची धडक कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नागाव : नागाव (ता. हातकणंगले) येथे सामायिक जमिनीचे क्षेत्र दुरुस्त करून सातबारा उताऱ्यावर नाव नोंदवण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने दोघांना रंगेहात पकडले. अवधूत रामचंद्र लोंढे (वय ३७) आणि सुरज कुंतीनाथ सोळांकुरे (वय ४२, दोघेही रा. नागाव) अशी संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागाव येथील एका तक्रारदाराच्या जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर क्षेत्राची चुकीची नोंद झाली होती. ही चूक दुरुस्त करण्यासाठी त्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयात अर्ज केला होता. त्यानंतर हे प्रकरण नागाव तलाठी कार्यालयाकडे पाठविण्यात आले. याबाबत चौकशी केली असता, तलाठी मॅडम यांच्या नावाने १५ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे सांगत खासगी व्यक्ती अवधूत लोंढे याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. अखेर तडजोडीनंतर १२ हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार मंगळवारी (३ नोव्हेंबर) एसीबीच्या पथकाने नागाव येथील शिवाजी चौक परिसरात सापळा रचला. यावेळी १२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अवधूत लोंढे आणि स्वतःला कोतवाल असल्याचे भासवणारा सुरज सोळांकुरे यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. महसूल विभागाच्या कामकाजात खासगी व्यक्तींच्या कथित हस्तक्षेपाचा मुद्दा या कारवाईमुळे पुन्हा ऐरणीवर आला असून, परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT