नागाव: ऑनलाईन साडेसहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगडमधील रायपूर पोलिसांनी सचिन अशोक सोळंकुरे ( वय ४३ ) व त्याचा भाऊ सारंग अशोक सोळंकुरे ( वय ३७, रा. नागाव ता. हातकणंगले जि.कोल्हापूर) या दोघांना मंगळवारी (दि.३० डिसेंबर) दुपारी तीन वाजता त्यांच्या मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून ताब्यात घेतले. त्यानंतर दोघांचे मोबाईल बंद केले. स्थानिक पोलीसांना या बाबतची काही माहिती न देता ही कारवाई झाल्याने ही कारवाई खरंच छत्तीसगड पोलिसांनीच केली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नागाव ( ता. हातकणंगले ) येथील सचिन सोळंकुरेचा सुमारे पाच वर्षांपूर्वी बेळगावजवळ अपघात झाला होता. त्यावेळी त्याचा मोबाईल गहाळ झाला होता. पण मोबाईल गहाळ झाल्याची तक्रार पोलिसात सचिनने दिली नव्हती. २०२४ मध्ये त्याच्या मोबाईल नंबरवरून साडेसहा लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार छत्तीसगडमधील रायपूर पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्या अनुषंगाने सचिनला छत्तीसगड पोलिसांनी मागील तीन महिन्यांत दोन वेळा नोटीस पाठवली होती. पण सचिनने या नोटीसीची खातरजमा केली नाही. सचिनच्या मोबाईल खरेदीवेळी त्याच्या भावाचा नंबर रजिस्टर होता. त्यामुळे त्याच्या लोकेशनवरून छत्तीसगड पोलिसांच्या सायबर पथकाने सचिनचा भाऊ सारंग यास नागाव येथील महिंद्रा शोरूम जवळ येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या फोनवरून सचिनला संपर्क साधून सचिनला कागल येथील बस स्थानकासमोर ताब्यात घेतले.
दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्या दोघांचे मोबाईल बंद करण्यात आले. ही घटना समजताच नागावमधील ग्रामस्थांनी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्रभारी अधिकारी बाबासाहेब सरवदे यांनी तात्काळ सायबर पोलिसांना ही घटना कळविली. तसेच कागल पोलीसाकडे चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रायपूर पोलिसांनी सारंग यास शिये फाटा येथे सोडले. त्यानंतर त्याचा भाऊ सचिन याला घेऊन पुन्हा ते अज्ञात ठिकाणी गेले. त्यामुळे या कारवाई बद्दल शंका व्यक्त करण्यात आली. रात्री उशीरा सचिनला सातारा येथे सोडून दिले. एकूणच ही बेकायदेशीर कारवाई खरचं छत्तीसगड पोलिसांची होती का याचा तपास करावा लागणार आहे.
सचिन आणि सारंग सोळांकुरे यांच्या नातेवाईकांनी या कारवाईची महिती देताच आम्ही कागल पोलिस व जिल्हा पोलिस मुख्यालयात संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर सायबर क्राईम पोलीसांना संबंधीत नंबर देऊन माहिती घेतली. छत्तीसगड पोलिसांनी या कारवाई स्थानिक पोलिसांना विश्वासात घेणे अपेक्षीत होते.बाबासाहेब सरवदे, सहायक पोलिस निरीक्षक