मुरगूड : निपाणी मार्गावर सुरुपलीजवळ ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून मुरगूडमधील आरोग्यसेविका क्लारिन संतान बारदेस्कर (वय ४८ ) ह्या जागीच ठार झाल्या. ड्युटीवरून घरी परतताना हा अपघात झाला. घटनेची नोंद रात्री उशीरा मुरगूड पोलिसात झाली आहे.
अपघातस्थळावरून मिळालेली माहिती अशी की मुरगूडमधील आरोग्य सेविका क्लारिन संतान बारदेस्कर ह्या चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवेत आहेत. त्या आज चारच्या सुमारास चिखली आरोग्य केंद्रातर्गत कौलगे गावचा सर्वे करून त्या बस्तवडे फाट्यावर आल्या. तेथून मुरगूडकडे निघालेल्या दुचाकीस्वाराला विनंती करून त्याच्या गाडीवर बसल्या. सुरुपलीजवळ रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरुमावरून गाडी स्लीप झाली तेंव्हा मोटरसायकलस्वार रस्त्याच्या बाजूला पडले तर मागे बसलेल्या क्लारिन बारदेस्कर ह्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली (क्र . एमएच ०९ डीपी ४५९० ) त्या सापडल्या. पोटावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या . हा अपघात सांयकाळी साडेचारच्या सुमारास झाला.
मयत श्रीमती बारदेस्कर यांचा मृतदेह मुरगूड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले . यावेळी ग्रामीण रुग्णालयासमोर नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती . उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत .