शिरोली एमआयडीसी : कासारवाडी (ता. हातकणंगले) येथील घाटात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्यासुमारास पतीने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरून चाकूने भोसकून खून केला होता. खून करून पसार झालेल्या सचिन रजपूत या आरोपीस शिरोली पोलिसानी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सचिन रजपूत (वय ३२) याला पत्नी शुभांगी सचिन रजपूत (वय २९ रा. सध्या हनुमान नगर शिये ता. करवीर मुळगाव गडिहग्लज) हिचे अन्य व्यक्तीशी अनैतिक संबंध असलेल्याचा संशय होता. या कारणामुळे दोघात भांडण झाल्याने तिचा गुरुवारी सायंकाळी जोतीबाचे देवदर्शन घेवून घरी परतत असताना पाच वाजण्यासुमारास कासारवाडी घाटात चाकूने भोसकून खून केला होता.
घटनास्थळावरून पसार होत शुक्रवारी सकाळी सात वाजण्याच्यासुमारास त्याने सोलापूर येथील फौजदार चौकीत स्वतःहून हजर राहून खुन केल्याची कबुली दिली होती . त्यानंतर शिरोली पोलिसांनी आरोपी पती सचिन रजपूत यास ताब्यात घेऊन खुनाचा तपास केला असता त्याने आपल्या पत्नीचा अन्य व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मी तिचा खून केला असल्याचे सांगितले त्यास आज शनिवारी पेठवडगाव न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. सचिन यांस तपास कामांकरिता कासारवाडी गटातील घटनास्थळी फिरवण्यात आले. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड करीत आहेत.