Kolhapur municipal corporation Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Water Price Hike | कोल्हापुरात महापालिकेचे पाणी महागणार

काळम्मावाडीतील पाणी पातळी वाढेपर्यंत टंचाई

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : महापालिकेच्या पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर शुक्रवारी (दि. १२) स्थायी समिती सभेत घमासान चर्चा झाली. अंतिम मंजुरीसाठी दरवाढ प्रस्तावाचा चेंडू महासभेच्या कोर्टात ढकलण्यात आला आहे. १७ जून रोजी होणाऱ्या महासभेत नगरसेवकांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर कोल्हापूरकरांना दुप्पट पाणीपट्टी दरवाढीचा झटका बसणार आहे. परिणामी, १ जुलैपासून महापालिकेचे पाणी महागणार आहे. त्यातून महापालिकेला महिन्याला सुमारे ४ ते ५ कोटी आणि वर्षाला सुमारे ५० कोटींची वाढ अपेक्षित आहे. सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली.

एमजीपीनुसार दरवाढीचा प्रस्ताव

आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड म्हणाले, महापालिकेने यापूर्वी १ एप्रिल २०२१ रोजी पाणीपट्टी दरवाढ केली होती. त्यानंतर वीज बिलात वाढ झाली आहे. तसेच पाणीपुरवठ्याच्या इतर खर्चातही वाढ झाली आहे. शहरालगत ग्रामीण भागात मनपापेक्षा जास्त पाणीपट्टी दर आहेत. त्या तुलनेत मनपाचे दर कमी आहेत. पाणीपुरवठ्यातून वर्षाला ४८ कोटी मिळतात आणि खर्च वर्षाला ११० कोटी होतो. उत्पन्न वाढल्यास नागरिकांना चांगल्या सुविधा देता येतील. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे कोल्हापूर शहर परिसरातील ग्रामीण भागात पुरविण्यात येणाऱ्या दरानुसार वाढ मिळावी, असे प्रस्तावात म्हटले आहे. २०२४-२५ मध्ये ५७ कोटी, तर २०२५-२६ मध्ये ४८ कोटी पाणीपट्टी जमा झाली होती. दरवाढ झाल्यास यंदाच्या वर्षी १०३ कोटी रुपये पाणीपट्टी अपेक्षित आहे.

एम. एस. ई. बी.कडून पुरवठा करण्यात येणााऱ्या वीज बिलात प्रचंड वाढ झाली आहे. २०२१ पासून प्रत्येक महिन्याला ४८ लाख रुपये बिल वाढले आहे. जलसंपदा विभागाकडून नदीतील कच्चे पाणी १ रु. ३२ पैसे (एक हजार लि.) दराने दिले जाते. त्यातही आता २८ पैशांची वाढ होणार आहे. परिणामी, त्याचा महिन्याला २८ लाखांचा बाेजा वाढणार आहे. त्यामुळे पाणीपट्टीही वाढविण्याची गरज आहे.
हर्षजित घाटगे (जलअभियंता)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT