कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 24 हजार मतदारांचा एक प्रभाग होणार आहे. प्रभाग रचनेसाठी महापालिका समिती स्थापन करणार आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने या प्रक्रियेला गती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर उपायुक्त पंडित पाटील आणि कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाढ यांच्या प्रमुख उपस्थितीत संबंधित अधिकार्यांची बैठक बुधवारी झाली. प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार, प्रभाग रचनेचे काम जलद आणि सुनियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्यात आली.
महापालिकेच्या प्रस्तावित नवीन प्रभाग रचनेनुसार शहरात एकूण 25 प्रभाग अस्तित्वात येणार असून, नगरसेवकांची संख्या 100 पर्यंत वाढणार आहे. यापूर्वी शहरात 81 प्रभाग आणि तितकेच नगरसेवक होते. नवीन प्रभाग सरासरी 24 हजार मतदार संख्येवर आधारित असतील. प्रभाग रचनेची अंतिम जबाबदारी प्रशासकांवर राहणार आहे.
प्रभाग रचनेच्या कामासाठी महापालिकेत समिती स्थापन केली जाणार आहे. या समितीमध्ये नगर रचना विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सर्व्हेअर आणि अभियंते यांचा समावेश आहे. प्रत्येक सदस्याला विशिष्ट जबाबदार्या नेमून देऊन ही समिती कार्यान्वित केली जाईल. प्रभागांचे प्रारूप तयार करताना प्रत्येकी एक हजार मतदारांच्या गणनेवर आधारित ‘प्रगणक गट’ तयार केले जातील. त्यानंतर भौगोलिक संलग्नता आणि सलगता लक्षात घेऊन हे प्रगणक गट जोडून अंतिम प्रभागांची रचना केली जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
महापालिका प्रभाग रचनेच्या कामासाठी आणि निवडणुकीशी संबंधित सर्व कामकाजासाठी ताराबाई गार्डन येथील आयुक्त कार्यालयात स्वतंत्र निवडणूक कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. निवडणुकीसंदर्भातील सर्व प्रक्रिया याच कार्यालयातून हाताळली जाईल. पहिल्या टप्प्यात निवडणूक नियंत्रण अधिकारी म्हणून उपायुक्त पंडित पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अधीक्षक म्हणून कर निर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाढ हे जबाबदारी सांभाळतील. हे सर्व काम महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार आहे.
महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचनेप्रमाणेच आरक्षणाची निश्चिती करण्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वांनुसार शासनाकडून लवकरच आदेश निघणार आहेत. यापूर्वीच्या 81 प्रभागांपैकी इतर मागासवर्गीयांसाठी (ओबीसी) 22 आणि अनुसूचित जातीसाठी 11 जागा आरक्षित होत्या. नवीन प्रभाग रचनेनंतर आरक्षित जागांची संख्या किती असेल, याबाबत शासन लवकरच स्पष्ट निर्देश जाहीर करेल, अशी अपेक्षा आहे.