कोल्हापूर : भाजप कार्यालयात गटनेतेपदासाठी बंद पाकिटातून नावे लिहून देताना नगरसेविका, नगरसेवक.  (छाया : पप्पू अत्तार)
कोल्हापूर

Kolhapur Municipal Corporation Mayor post election | महापौरपद निवड 31 पर्यंत; भाजप-शिवसेनेत खलबते

रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदाची निवडणूक 30 किंवा 31 जानेवारीला होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, आघाड्यांची नोंदणी आणि गटनेत्यांची निवड या प्रक्रियांना सध्या राजकीय पक्षांनी सर्वोच्च प्राधान्य दिले असून, त्यानंतर महापौरपदाच्या राजकारणाला निर्णायक वेग येणार आहे.

शुक्रवारी भाजपने गटनेता निवडीसाठी बैठक घेऊन बंद पाकिटातून नगरसेवकांची मते प्रदेश कार्यालयाकडे पाठविली. शिवसेनेकडून शारंगधर देशमुख, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आदिल फरास यांचे गटनेतेपद निश्चित झाले आहे. महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या भाजप आणि शिवसेना यांच्यात महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपकडून रूपाराणी निकम, विजयसिंह खाडे-पाटील, प्रमोद देसाई, विजय देसाई, वैभव कुंभार यांच्यासह अनेक नावे चर्चेत आहेत. महापौरपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने पात्रतेसाठी जातप्रमाणपत्र व जातपडताळणीची प्रक्रिया निर्णायक ठरणार आहे.

खुल्या प्रवर्गातून निवडून आलेले; मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र असलेले नगरसेवकही ही निवडणूक लढवू शकतात. मात्र, त्यासाठी जातपडताळणी पूर्ण झालेली असणे किंवा किमान त्यासाठी अर्ज केलेला अधिकृत टोकन असणे आवश्यक आहे. महापालिकेत आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

महापौरपद आपल्याच गटातील व्यक्तीकडे यावे, यासाठी पक्षांतर्गत कुरघोडीचे राजकारणही रंगात आले आहे. सध्या महायुतीत पहिला महापौर भाजपचाच होईल असे चित्र असले, तरी शिवसेनेतही हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. भाजपमध्ये रूपाराणी निकम यांच्या नावासाठी एक प्रभावी गट सक्रिय झाला असून, विजयसिंह खाडे-पाटील यांच्यासाठी मूळ भाजपमधील स्वतंत्र लॉबी काम करत असल्याचे चित्र आहे. उर्वरित इच्छुक नगरसेवक हे नवखे असून, त्यांनी आपापल्या पातळीवर नेते मंडळींकडे महापौरपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, अद्याप कोणालाही ठोस शब्द देण्यात आलेला नाही.

नवीन चेहर्‍याला संधी मिळणार?

महापौरपदासाठी अनुभवी नगरसेवक म्हणून रूपाराणी निकम आणि विजयसिंह खाडे-पाटील यांची नावे आघाडीवर असली, तरी ऐनवेळी नवख्या उमेदवाराला संधी देण्याचा विचारही वरिष्ठ पातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. काही नेत्यांनी तसे सूचक वक्तव्य केले आहे.

शिवसेनेत दोघांमध्ये चुरस

महापौरपद शिवसेनेकडे गेल्यास नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेले अजय इंगवले आणि अश्किन आजरेकर या दोन नावांचा प्रामुख्याने विचार केला जात आहे. याशिवाय सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आलेले; मात्र नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे प्रमाणपत्र असलेले नगरसेवकही पात्र ठरू शकतात. त्यामुळे शिवसेनेतही संभाव्य उमेदवारांचा शोध आणि अंतर्गत चाचपणी सुरू आहे.kolhapur

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT