कोल्हापूर ः महापालिकेचा कारभार ‘आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय...’ या म्हणीप्रमाणे सुरू आहे. कचरा प्रक्रियेच्या नावाखाली महापालिकेची तिजोरी रिकामी होत असताना अनेक टन कचर्यावर प्रक्रिया होत नसेल, तर खर्च झालेला पैसा गेला कुठे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या कोंडाळ्यातूनही पैसे खाणारी एक यंत्रणा महापालिकेत कार्यरत झाली असून या यंत्रणेनेच प्रक्रिया झाल्याचे भासवून लाखो रुपये उकळल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेने 53 टन कचर्यापासून प्रक्रिया केलेला एक खतनिर्मितीचा प्रकल्प कसबा बावडा येथे उभारला आहे. या प्रकल्पातून खत निर्माण व्हावे, ही अपेक्षा आहे; पण तसे काहीच झाले नसल्याचे पाहणीत आढळून आले आहे. कचर्यातील प्लास्टिकचे संकलन स्वतंत्रपणे केले पाहिजे. त्यासाठी आलेल्या कचर्याचे वर्गीकरण करायला हवे; पण वर्गीकरणानंतर बाहेर काढलेले प्लास्टिक आहे तरी कोठे,याचा उलगडा पाहणीमध्ये आढळून आलेेला नाही.
लिचेड प्रक्रिया प्रकल्प सुरू असल्याचे सांगून महापालिकेला 85 लाखांचे बिल एका ठेकेदार कंपनीने सादर केले होते. यापैकी 65 लाख रुपयांचे बिल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे; पण प्रकल्पाच्या पाहणीमध्ये लिचेड संकलनच आढळून आले नाही, तर मग लिचेड प्रक्रिया प्रकल्प सुरू कसा, असा सवाल आता उपस्थित होत आहे. एकूणच कचर्याच्या कामात ‘खा की खा’ सुरू आहे. कचरा ढकलण्यासाठी लावण्यात येणार्या मशिनरीवर (जेसीबी) देखील लाखो रुपये खर्च होत आहेत. ही सर्व कामे होतात की नाही? या कामातील नेमकेपणा टिपणारे वरिष्ठ अधिकारी महापालिकेत नाहीत. असतील तर त्यांची या सर्व कामांकडे डोळेझाकच सुरू आहे. त्यामुळे महापालिकेच्या कचरा प्रक्रियेच्या नावाखाली मोठा घोळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
खतनिर्मिती करण्याची प्रक्रिया साधी, सोपी आहे; परंतु यातूनही लाखो रुपये उकळले जात आहेत. कचरा म्हणजे घाण, दुर्लक्षित घटक; पण याच कोंडाळ्यातून लाखोची माया जमविणारी एक टोळी महापालिकेत कार्यरत झाली असून या टोळीने महापालिकेच्या तिजोरीला चांगलीच गळती लावल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 53 टनांचा खतनिर्मिती प्रकल्प आहे; पण यातून केवळ चार टनच खत निर्माण होत असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे कचरा प्रक्रियेच्या कामात गोलमाल असल्याचा संशय आहे.