Kolhapur Municipal Elections : प्रभागरचनेकडे लक्ष; पक्षीय भूमिका गुलदस्त्यातच Pudhari File Photo
कोल्हापूर

Kolhapur Municipal Elections : प्रभागरचनेकडे लक्ष; पक्षीय भूमिका गुलदस्त्यातच

बहुसदस्यीय पद्धतीमुळे राजकीय समीकरणे बदलणार

पुढारी वृत्तसेवा
डॅनियल काळे

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असले, तरी बहुसंख्य इच्छुकांनी अद्याप कोणताही झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे, बहुप्रतिक्षित प्रभागरचना. या रचनेमुळे अनेक प्रभागांचे आरक्षण आणि मतदारांचा टक्का बदलणार असल्याने, अंतिम चित्र स्पष्ट होईपर्यंत सावध पवित्रा घेण्याचा निर्णय बहुतांश इच्छुकांनी घेतला आहे.

राजकीय भवितव्य प्रभागरचनेवर

आगामी निवडणुकीसाठी लागू होणारी बहुसदस्यीय प्रभागरचना इच्छुकांसाठी निर्णायक ठरणार आहे. प्रत्येक प्रभागात नेमक्या कोणत्या वसाहतींचा समावेश असेल, कोणत्या जाती-धर्माचे प्राबल्य राहील आणि संभाव्य प्रतिस्पर्धी कोण असतील, याचा अंदाज आल्यानंतरच राजकीय दिशा निश्चित केली जाणार आहे. अनेकजण सध्या केवळ ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत असून, काही इच्छुकांनी तर शेजारच्या संभाव्य प्रभागांमध्येही संपर्क मोहीम सुरू केली आहे, जेणेकरून ऐनवेळी राजकीय सोय बघता येईल.

शहरातील दलित व मुस्लिम मतदार, विशेषतः सुमारे 54 झोपडपट्ट्या आणि दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये, निवडणुकीचा कौल ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या प्रभागांमध्ये भाजप किंवा शिंदे गट थेट उमेदवारी देण्यास काहीसा कचरत असल्याचे दिसते. अशा ठिकाणी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) किंवा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. एकूणच, भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट यांच्यात जागा वाटपाचे सूत्र कसे ठरते, यावर बरेच काही अवलंबून असेल. काही ठिकाणी महाडिकांच्या ताराराणी आघाडीलाही संधी मिळण्याची चर्चा आहे.

दीड दशकापासून महापालिकेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फुटीनंतर राजकारणात नवी समीकरणे उदयास आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता आहे, जे ‘इंडिया’ आघाडीचे घटक पक्ष आहेत. त्यांच्या विरोधात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाची महायुती उभी ठाकणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी चुरशीची ठरणार आहे.

नव्या प्रभागरचनेचा थेट परिणाम मतांच्या गणितावर होणार आहे. पूर्वीच्या तुलनेत प्रभाग मोठे होणार असून, मतदारसंख्या 20 हजारांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे विजयी होण्यासाठी किमान 4 हजारांहून अधिक मतांची आवश्यकता भासेल. एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यायचे असल्याने, पॅनेलमधील सहकारी कोण आहेत, याचा बारकाईने अभ्यास करूनच उमेदवार पक्षाची निवड करतील.

विचारपूर्वक उडी

महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यापूर्वी इच्छुक ‘विचारपूर्वक उडी’ घेण्याच्या तयारीत आहेत. प्रभागरचना, आरक्षण आणि सामाजिक समीकरणांचे गणित सुटल्याशिवाय कोणीही भूमिका स्पष्ट करणार नाही. त्यामुळे निवडणुकीच्या या रंगतदार शर्यतीची ‘पहिली दिशा’ ही प्रभागरचनाच ठरवणार आहे, हे निश्चित.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT