चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुकीत मंत्री, खासदार, आमदार, विविध पक्षांच्या अध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काहींसाठी तर ही निवडणूक त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाईच आहे. तालुक्याचे राजकारण हाती ठेवण्यासाठी नगरपालिका-नगरपंचायती आणि पंचायत समिती ही दोन चाके कार्यरत ठेवावी लागतात.
त्यामुळे तालुक्याच्या राजकारणावरील वर्चस्वासाठी नेत्यांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजल्या जाणार्या कागलच्या राजकारणाने जिल्ह्याला धक्काच दिला. एकमेकांचे कट्टर शत्रू नव्हे, तर वैरी समजले जाणारे हसन मुश्रीफ व समरजित घाटगे एकत्र आले. आता त्यांच्या विरोधात मोट बांधून लढणार्या संजय मंडलिक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
संजय घाटगे यांना तेथे अस्तित्व शोधावे लागणार आहे. मुरगूडलाही अशीच स्थिती आहे. तेथे मंडलिक गटाचे मुश्रीफ गटात व मुश्रीफ गटाचे कार्यकर्ते मंडलिक गटात गेल्याने राजकीय चुरस वाढली आहे. कागलला मुश्रीफ-घाटगे एकत्र आले, तसे जयसिंगपूरला कट्टर विरोधक सतेज पाटील व धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते एकत्र आल्याने चर्चेचा विषय ठरला.
तेथे आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात ही आघाडी आहे. गणपतराव पाटील, राजू शेट्टी, चंद्रकांत जाधव आदींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिरोळ तालुक्यातील तिन्ही नगरपंचायतींत यड्रावकर यांना घेरण्यात विरोधकांना यश आले असले, तरी निवडणुकीच्या आखाड्यात कोण कोणाला चितपट करणार, हे पाहावे लागेल.
कारण, शिरोळला यड्रावकर विरोधात आ. अशोकराव माने, धनंजय महाडिक, माधवराव घाटगे यांची ताकद एकवटली. सतेज पाटील समर्थकही रिंगणात आहेत. कुरुंदवाडला यड्रावकर व रामचंद्र डांगे एकत्र असून, विरोधात मयूर संघाचे डॉ. संजय पाटील यांची एक व जयराम पाटील यांचे नेतृत्व मानणार्यांची एक अशी तिहेरी लढत आहे.
गडहिंग्लजला जनता दल-भाजप एकत्र आले, हाच जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे. तेथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर समर्थक, भाजप आमदार शिवाजीराव पाटील, जनसुराज्यचे विनय कोरे, जनता दलाच्या स्वाती कोरी यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ समर्थक अशी लढत आहे. चंदगडला हसन मुश्रीफ, राजेश पाटील यांच्या विरोधात आ. शिवाजीराव पाटील, आजर्यात प्रकाश आबिटकर, शिवाजीराव पाटील व धनंजय महाडिक समर्थक, अशोक चराटी विरुद्ध सतेज पाटील, हसन मुश्रीफ समर्थक अशी लढत होत आहे.
हातकणंगलेत खासदार धैर्यशील माने समर्थक विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार राजुबाबा आवळे, राजू किसन आवळे, विरुद्ध हसन मुश्रीफ समर्थक अशी लढाई होत आहे. हुपरी, वडगावमध्ये भाजपचे आमदार राहुल आवाडे विरुद्ध दौलतराव पाटील यांची आघाडी अशी लढत आहे. मलकापूरला विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील, रणवीर गायकवाड, राजू शेट्टींची संघटना असा सामना आहे.
वडगावला स्थानिक उमेदवारांतच चुरस आहे. त्यांना बाहेरून नेत्यांचा पाठिंबा आहे. विनय कोरे, धनंजय महाडिक, अशोकराव माने, सालपे गट विरुद्ध विद्या पोळ यांची आघाडी अशी लढत असून पोळ यांना सतेज पाटील यांचे समर्थन असल्याचे सांगण्यात येते. पन्हाळ्यात विनय कोरे यांचे एकहाती वर्चस्व होते. आता त्यांना आसिफ मोकाशी व सतीश भोसले यांच्यासह लढत द्यावी लागत आहे. विरोधात लढणार्यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व सत्यजित पाटील-सरूडकर यांचा पाठिंबा आहे.