कोल्हापूर : प्रतिस्पर्ध्यांनी घेतलेले जोरदार आक्षेप, त्यावर सुनावणीत झालेली घमासान आणि त्यातून निर्माण झालेला तणाव आणि नंतर सुटकेचा सोडलेला निःश्वास अशा वातावरणात बुधवारी महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी झाली. शहरातील सात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात 21 अर्ज अवैध ठरले. सर्वाधिक 7 अर्ज दुधाळी पॅव्हेलियन कार्यालयातील उमेदवारांचे अवैध ठरले. राजोपाध्येनगर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.
दुधाळी पॅव्हेलियन हॉल निवडणूक कार्यालयात दाखल करण्यात आलेल्या 116 उमेदवारी अर्जांपैकी 7 उमेदवारी अर्ज अवैध ठरले. 109 उमेदवारांचे अर्ज पात्र झाले. माजी नगरसेवक नंदकुमार मोरे यांच्या अर्जावर माजी नगरसेवक प्रताप जाधव यांनी हरकत घेतली. त्यावर झालेल्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. शीला सोनुले यांच्या अर्जावर नीलेश हंकारे यांनी हरकत घेतली. यावेळी सुनावणीत खडाजंगी झाली. सुनावणीनंतर दोघांचेही अर्ज वैध ठरले.
शहाजी कॉलेज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रभाग क्रमांक 12 मधून माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे पती अश्किन आजरेकर यांच्या अर्जावर प्रतिस्पर्धी रियाज सुभेदार यांनी आक्षेप घेतला. आजरेकर यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात सर्व संपत्तीचा उल्लेख केला नसल्याने हरकत घेतली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. दोघांच्या समर्थकांची गर्दी झाली. सुनावणीनंतर निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी हा अर्ज वैध ठरविल्यानंतर तणाव निवळला.
व्ही. टी. पाटील सभागृह कार्यालयात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या प्रतिज्ञा उत्तुरे यांच्या अर्जांसोबत जोडलेल्या एबी फॉर्मवर भाजपच्या उमेदवार जस्मिन आजम जमादार यांनी आक्षेप घेतला. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी सुनावणी घेत कागदपत्रे तपासल्यानंतर जमादार यांचा तक्रार अर्ज फेटाळला. दरम्यान, तीन उमेदवारांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्येकी एक काढून घेतले. एका उमेदवाराने जात पडताळणी प्रमाणपत्र अथवा त्याचे टोकन जोडले नसल्याने, तर दोघा उमेदवारांचे तीन अपत्ये असल्याने अर्ज अवैध ठरवण्यात आले.
लाईन बाजार निवडणूक कार्यालयात मतदार यादीतच नाव नसल्याने एका उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला. याखेरीज उर्वरित सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. हॉकी स्टेडियम निवडणूक कार्यालयात दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. त्यामुळे या कार्यालयांतर्गत 87 उमेदवारांचे 117 अर्ज वैध ठरले. एका अपक्ष महिला उमेदवाराने अुनमोदक व सूचक एकच दिल्याने, तर एका महिला उमेदवाराने अपूर्ण शपथपत्र सादर केल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले.
गांधी मैदान कार्यालयात अपक्ष अर्ज भरलेल्या मधुकर रामाणे आणि स्वप्नाली जाधव यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. मात्र, सुनावणीत ते फेटाळण्यात आले. सूचक, अनुमोदक यांची सही नसल्याने एकाचा, तर शपथपत्र अपूर्ण असल्याने एकाचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. मात्र, त्यांचे अन्य दोन अर्ज असल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली आहे. राजोपाध्येनगर कार्यालयात उमेदवारांनी दाखल केलेले सर्वच अर्ज छाननीत वैध ठरले. उमेदवारांनी एकापेक्षा अधिक दाखल केलेले अर्ज काढून घेत प्रत्येकी एकच अर्ज ठेवले. यामुळे या कार्यालयातील तीन प्रभागांतील 69 उमेदवारांचे अर्ज कायम राहिले.