कोल्हापूर ः कोल्हापूर महापालिकेची निवडणूक जानेवारी 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांनंतर महापालिका निवडणुकीची तारीख निश्चित होईल. या निवडणुकीत 20 प्रभागांतून 81 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे.
महापालिकेची यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार 3 सप्टेंबरला प्रभागरचनेचे प्रारुप जाहीर झाले. सध्या त्यावरील हरकती व आक्षेपांवर सुनावणी सुरू आहे. त्यानंतर आरक्षण सोडत, मतदार याद्यांची तयारी आणि इतर प्रक्रिया पूर्ण होईल. ही सर्व कामे 15 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होतील, असा अंदाज आहे. त्यानंतर 45 दिवसांचा कालावधी गृहित धरल्यास, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे. प्रशासकीय तयारीबरोबरच राजकीय पक्षांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. प्रभागनिहाय संभाव्य उमेदवारांची यादी तयार करण्याचे काम पक्षांनी सुरू केले असून, सक्षम उमेदवारांना आपल्या पक्षाकडे वळवण्याचा प्रयत्न वेगाने सुरू आहे. प्रभागरचनेचे प्रारुप जाहीर झाल्यानंतर उमेदवारांमध्ये चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. नव्या प्रभागांची व्याप्ती भौगोलिकद़ृष्ट्या मोठी असल्याने मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी संभाव्य उमेदवारांनी ‘पायाला भिंगरी’ बांधली आहे. दारोदारी संपर्क मोहिमेसोबतच धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधून मतदारांशी जवळीक साधण्याचे प्रयत्न होत आहेत. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक तयारी सध्या वेगाने सुरू असून, जानेवारी 2026 मध्ये मतदारांचा कौल कोणाला मिळतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.