कोल्हापूर : महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या जनसुराज्य शक्ती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले) महायुतीमधून बाहेर पडत कोल्हापूर महानगरपलिकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र आघाडीची घोषणा केली. जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना महापालिकेत आम्हाला सोबत घेतल्याशिवाय कोणालाही सत्ता स्थापन करता येणार नाही, असे सांगितले. आघाडीच्या वतीने 30 जागा लढविण्यात येणार आहेत. यामध्ये 2 जागा आरपीआयला देण्यात आल्या आहेत.
जनसुराज्य शक्ती महायुतीचा घटक पक्ष असला तरी राज्यात अनेक ठिकाणी भाजप-शिवसेनेची युती झालेली नाही. सांगलीत आम्ही महायुतीसोबत आहोत; परंतु कोल्हापुरात सन्मानजनक जागा देण्यास नकार दिल्यामुळे महायुतीतून बाहेर पडून स्वतंत्र आघाडी करत आहोत. 30 जागा आम्ही लढविणार असून महापालिकेत नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी सांगितले.
भाजपकडे आम्ही जागांची मागणी केली होती; परंतु त्यांचा प्रस्ताव एक, दोन जागांच्या पुढे जात नव्हता. तरीही आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होतो; परंतु नंतर महायुतीच्या नेत्यांनी फोनच बंद केले, असा आरोप कांबळे यांनी केला. आरपीआयच्या वतीने वैशाली मिसाळ आणि योगेस अजाटे यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी आ. अशोकराव माने, प्रा. शहाजी कांबळे, रमेश पुरेकर, महेश बराले, शांतिनाथ लिंबानी आदी उपस्थित होते.