कोल्हापूर : माजी महापौर हसीना फरास यांच्यासह 12 माजी नगरसेवकांनी महापालिका निवडणुकीतून माघार घेतली. माघारीच्या अखेरच्या दिवशी, शुक्रवारी सर्वत्रच साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब झाला, त्यातून एकूण 205 जणांनी माघार घेतली.
माजी महापौर फरास यांच्यासह त्यांचे सुपुत्र आदिल फरास निवडणूक रिंगणात होते. एकाच घरात दोन उमेदवारी दिली होती. मात्र, हसीना फरास यांनी आज माघार घेतली. शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल चव्हाण यांनी बंडखोरी करत आपला आणि पत्नीचा अर्ज दाखल केला होता. आपला अर्ज मागे घेत, त्यांनी पत्नीची उमेदवारी मात्र कायम ठेवली.
माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनीही उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, पत्नींसाठी त्यांनी तो माघारी घेतला. त्यांची पत्नी महायुतीकडून निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. माजी नगरसेवक संदीप कवाळे यांनी भावासाठी, प्रकाश गवंडी यांनी पत्नीसाठी आपले अर्ज मागे घेतले. यासह माजी नगरसेवक अमोल माने, महेश वासुदेव, रवींद्र मुदगी, प्रकाश काटे, निशिकांत मेथे, नंदकुमार सूर्यवंशी यांनीही आपले अर्ज मागे घेतले. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपपल्या उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. मात्र, राष्ट्रवादीच्या योगिता कोडोलीकर यांनी आपला अर्ज मागे घेतला.
जिल्हा प्रमुखाच्या मुलाचे बंड झाले थंड
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण यांचा मुलगा प्रसाद चव्हाण यालाच महायुतीने उमेदवारी नाकारली. यामुळे प्रसाद चव्हाण यांनी बंडखोरी करत जनसुराज्य शक्ती पक्षातून उमेदवारी दाखल केली होती. मात्र, त्यांचे बंड थंड झाले. प्रसाद चव्हाण यांची बंडखोरी रोखण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले. यामुळे प्रसाद चव्हाण यांनी माघार घेतली. मात्र, यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाला धक्का बसला असून त्यांचा एक उमेदवार कमी झाला. चव्हाण यांच्या माघारीचीही चर्चा सुरू होती.
धनश्री तोडकर यांनी घेतली माघार
भाजपच्या सरचिटणीस धनश्री तोडकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावर त्यांनी थेट भाजप कार्यालयासमोर जाऊन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यांची समजूत काढताना भाजप पदाधिकार्यांशी कार्यकर्त्यांचा वादही झाला होता. या पार्श्वभूमीवर तोडकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत भाजपशी बंडखोरी केली होती. मात्र, शुक्रवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
माजी स्थायी समिती सभापतीची माघार
शहाजी कॉलेज निवडणूक कार्यालय अंतर्गत 3 प्रभागांतून 37 उमेदवारांनी माघार घेतली. प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महापौर हसीना फरास यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून वैष्णवी जाधव यांना दिली. एकाच कुटुंबात दोन उमेदवारी नको, अशी भूमिका पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर घेतल्याने हा अर्ज मागे घेण्यात आला. शिवसेनेचे अश्किन आजरेकर यांच्यासाठी स्थायी समिती माजी सभापती जितेंद्र सलगर यांनी माघार घेतली.
शेवटपर्यंत राजकीय पक्षांचा घोळच
एकाच प्रभागात महायुतीमध्ये उमेदवारी देण्यावरून गोंधळ होता. प्रभाग क्रमांक 12 मध्ये शिवसेनेकडून संगीता रमेश पोवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आले नाही. अखेर पोवार यांनी आपला उमेदवारी अर्ज कायमच ठेवला आहे.