सागर यादव
कोल्हापूर : महापालिका निवडणूक रिंगणात असणार्या एकूण 15 खेळाडूंपैकी 5 खेळाडूंनी राजकीय मैदान मारत विजय मिळवला, तर 10 जणांना पराभवाला सामोरे जावे लागले.
इतर विविध क्षेत्रांप्रमाणेच खेळाचे मैदान गाजविणारे अनेक खेळाडू उमेदवार यंदाच्या महापालिका निवडणुकीच्या रिंगणात शड्डू ठोकून उभे होते. यात फुटबॉलपटू रिची फर्नांडिस, विनायक फाळके, दीपक थोरात, ओंकार जाधव, विजयसिंह खाडे-पाटील, शिवतेज खराडे, अश्किन आजरेकर, विरेंद्र मोहिते, संतोष माळी, हॉकीपटू विजय साळोखे- सरदार व उमेश पोवार, टेनिसपटू राहुल माने, क्रिकेटपटू सचिन चौगले, शिवकालीन युद्धकला खेळाडू संदीप ऊर्फ नाना सावंत आणि जलतरणपटू अर्जुन माने यांचा समावेश होता. याशिवाय अनेक उमेदवारांनी निवडणुकीसाठी फुटबॉल, हॉकी स्टीक, शिट्टी या खेळांसदर्भातील निवडणूक चिन्हे निवडली होती. अटीतटीच्या निवडणुकीत विनायक फाळके, विजयसिंह खाडे - पाटील, अश्किन आजरेकर (तिघे फुटबॉलपटू), सचिन चौगले (क्रिकेटपटू), अर्जुन माने (जलतरणपटू) यांनी आपआपल्या प्रभागातील गटात विजय मिळवला. उर्वरित 10 खेळाडू उमेदवारांना कमी-अधिक फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले.
विजय साळोखे-सरदारांची झुंज
प्रभाग क्रमांक 7 मध्ये हॉकीपटू विजय साळोखे-सरदार व आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांच्यात लढत झाली. सत्ताधारी पक्षातील आमदारांना माजी नगरसेवक असणार्या विजय साळोखे यांनी कडवी झुंज दिली. सोशल मीडियावर या लढतीची चांगलीच चर्चा रंगली होती. यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता होती. या लढतीत ऋतुराज क्षीरसागर यांनी 9,231 मतांसह विजय मिळवला. पराभूत उमेदवार विजय साळोखे-सरदार यांनी हा पराभवही तितक्याच खिलाडूवृत्तीने स्वीकारत ‘हार-जीत चालायचीच, जनतेसाठी निवडणुकीच्या रिंगणात होतो. जनतेचा कौल मान्य आहे,’ अशी एका सच्चा खेळाडूला शोभणारी प्रतिक्रिया व्यक्त केली.