कोल्हापूर : साम-दाम-दंड-भेद नीतीचा अवलंब करत बंडखोरांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे प्रयत्न शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहिले. त्यात काहींना यश आले, तर काहींना अपयश आले. माजी महापौरांसह 12 माजी नगरसेवकांनी आपली तलवार म्यान केली. यामुळे कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट 17 ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याने तिथे आरपारची, तर 20 ठिकाणी तिरंगी लढत होत असल्याने तिथेही काँटे की टक्कर होणार आहे. उर्वरित ठिकाणी चौरंगी, बहुरंगी लढती होणार आहेत.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शुक्रवारी अखेरच्या दिवशी 205 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. एकूण 274 जणांची माघार झाल्याने 81 प्रभागांसाठी निवडणूक रिंगणात 325 उमेदवार राहिले आहेत. यामध्ये तब्बल 71 अपक्ष उमेदवारही आहेत. शनिवारी (दि. 3) चिन्हवाटप होणार असून, दुपारपासून चिन्हासह प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
महापालिकेच्या 81 जागांसाठी 20 प्रभागांतून चुरशीने अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुती, महाविकास आघाडीतून इच्छुक असलेल्यांनी तिकीट न मिळाल्याने नाराज होत, शड्डू ठोकून बंडखोरी केली. जनसुराज्य शक्ती आणि तिसर्या आघाडीची साथ काहींना मिळाली, त्यामुळे छाननीनंतर 599 उमेदवारी अर्ज होते. गुरुवारी 69 जणांनी उमेदवारी मागे घेतली. आज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नेत्यांसह प्रमुख पदाधिकार्यांनी ‘फिल्डिंग’ लावली होती. फोनाफोनी, मध्यस्थी घालत, तसेच प्रत्यक्ष संपर्क साधत माघारीसाठी मनधरणी केली जात होती. काहींना विविध आश्वासनांसह प्रलंबित कामे पूर्णत्वाला नेण्याचेही वचन दिले जात होते, त्यासह काहींना थेट गर्भित इशाराही दिला जात होता.
आजचा अखेरचा दिवस असल्याने चार तासांचीच संधी होती. आपल्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सोपा व्हावा, यासाठी अडचणीच्या ठरणार्या उमेदवारांच्या माघारीसाठी पहाटेपासूनच प्रयत्न सुरू होते. त्यानुसार पदाधिकारी, कार्यकर्त्यांचेही नियोजन केले होते. वाहनांचे ताफेही सज्ज होते. दुसरीकडे, निवडणूक लढवण्यावर ठाम असलेल्या काहीजणांनी दुपारी तीनपर्यंत आपला संपर्कच होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेतली होती. त्यामुळे सकाळपासून अशा उमेदवारांचा नेते, पदाधिकारी शोध घेत होते. त्यातून काहींना यश आले, तर काहींशी अखेरपर्यंत संपर्क झालाच नाही. दुपारी तीन वाजेपर्यंत अनेकांची धडपड सुरूच होती. मात्र, दुपारी तीननंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचे दरवाजे बंद करण्यात आले. यानंतर धावत पळत आलेल्या काहींना माघार घेता आलीच नाही. दुपारी तीननंतर निवडणूक अधिकार्यांनी माघार घेतलेल्या उमेदवारांच्या यादीसह निवडणूक लढवणार्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करून ती प्रसिद्ध केली.
माघारीनंतर महापालिकेच्या लढतींचे चित्र स्पष्ट झाले. महायुती आणि महाविकास आघाडीत लढत होणार हे स्पष्ट असले, तरीही अनेक ठिकाणी जनसुराज्य शक्ती पक्ष व रिपब्लिकन पार्टीची आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आम आदमी पक्ष व वंचित बहुजन आघाडीच्या तिसर्या आघाडीचेही आव्हान राहणार आहे. महापालिकेच्या आठ प्रभागांतील 17 ठिकाणी एकास एक अशी दुरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक 1 - ब आणि ड मध्ये, प्रभाग क्रमांक 2 - क मध्ये, 3 - अ, ब, क मध्ये, 5 - ब आणि क मध्ये, 6 - अ मध्ये, 9 - ब, क, ड मध्ये, 10 - अ व ब मध्ये, तर 16 अ, ब आणि क मध्ये प्रत्येकी दोनच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. 20 ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. या ठिकाणी तीनच उमेदवार माघारीनंतर राहिल्याने चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक 1 - क मध्ये, 2 - ब मध्ये, 5 - अ, 6 - क, 7 - अ, ब आणि क मध्ये, 8 - अ, 9 - अ, 10 - ड, 12 - ड, 14 - अ, क, 15 - अ, ब, ड,18 - क, 20 - ब, ड, ई मध्ये आणि प्रत्येकी तीनच उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
71 अपक्षांनीही ठोकला शड्डू
महापालिकेसाठी विविध राजकीय पक्षांकडून निवडणूक रिंगणात उतरत 254 जण नशीब अजमावत आहेत. त्यांच्यासोबतच 71 जणांनी अपक्ष म्हणून या निवडणुकीत शड्डू ठोकले आहेत. प्रभागाच्या नव्या सरंचनेमुळे अपक्षांची संख्या कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र, या निवडणुकीतही अपक्षांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.
इचलकरंजीत 153 जणांची माघार
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत उमेदवारी माघारीच्या शुक्रवारी अंतिम दिवशी एकूण 153 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. आता निवडणूक रिंगणात 230 उमेदवार राहिले आहेत. माघार घेतलेल्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अमित गाताडे, शिवसेना शिंदे गटाच्या उमा गौड, वंचित बहुजन आघाडीच्या संगीता निर्मळे, बादल शेख, सुनीता आवळे, संध्या बनसोडे, वर्षा कांबळे, युवा महाराष्ट्र सेनेचे सोहम पटेल, एमआयएमचे वाजीद सावनुरे आणि आरपीआय आठवले गटाच्या रोहिणी गेजगे यांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 3) उमेदवारांची यादी निश्चित होऊन चिन्हांचे वाटप होणार आहे.
महापालिकेच्या 16 प्रभागांत 65 जागा आहेत. त्यासाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी 456 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत 383 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. माघारीसाठी दोन दिवसांचा अवधी असल्याने मोठ्या घडामोडी घडल्या. गेल्या दोन दिवसांपासून माघारीसाठी बंडखोरांना थोपवण्यासह अपक्षांची मनधरणी सुरू होती. गुरुवारी दिवसभरात 22 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. शुक्रवारी सकाळपासून अर्ज माघारीसाठी हालचाली गतिमान झाल्या होत्या. अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी एकूण 153 जणांनी निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामध्ये विभागीय कार्यालय ‘अ’मधून 49, विभागीय कार्यालय ‘ब’मधून 35, विभागीय कार्यालय ‘क’मधून 33, तर विभागीय कार्यालय ‘ड’मधून 36 उमेदवारांचा समावेश आहे. माघार घेतलेल्यांमध्ये माजी नगराध्यक्षा, माजी सभापती, माजी नगरसेवक आदींसह राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि अनेक दिग्गजांचा समावेश आहे. एकाच प्रभागात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या दाम्पत्यानेही अर्ज माघार घेतला. निवडणुकीच्या रिंगणात आता 230 उमेदवार उरले आहेत. उद्या चिन्हवाटप झाल्यानंतर खर्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे.