कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी चार सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपला संपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. पारंपरिक एक सदस्यीय प्रभाग रचनेच्या तुलनेत आता प्रभागाचा व्याप चौपट वाढणार आहे. परिणामी, इच्छुक उमेदवारांनी स्वतःच्या प्रभागासोबतच शेजारच्या तीन ते चार प्रभागांतही आपला प्रभाव टाकण्याची रणनीती आखली आहे.
राजकीय संधीचा सुगावा लागताच इच्छुकांनी मैदानात उडी घेतली आहे. महापालिकेची निवडणूक तब्बल पाच वर्षांपासून प्रलंबित होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि प्रशासकीय हालचालींना गती मिळाली. नगरविकास विभागाने चार सदस्यीय प्रभाग रचनेचा अधिकृत आदेश दिल्यानंतर संभाव्य उमेदवारांचे खर्या अर्थाने संपर्क अभियान सुरू झाले आहे.
नवीन रचनेनुसार, प्रत्येक प्रभागात मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे साधारणतः वीस हजार मतदारांपर्यंत पोहोचणे हे इच्छुकांसमोर मोठे आव्हान आहे. यासाठी समाजातील महत्त्वाच्या व्यक्ती, मंडळांचे पदाधिकारी, महिला मंडळे, युवा गट यांची यादी तयार केली जात आहे. प्रत्येक मतदाराशी सुसंवाद साधण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे.
निवडणुकीपूर्वी येणारा गणेशोत्सवही संपर्क वाढवण्याच्या द़ृष्टिकोनातून पर्वणी ठरणार आहे. इच्छुक उमेदवार सकाळी लवकर उठून फिरायला येणार्या ज्येष्ठ नागरिकांना हाय-हॅलो करत, त्यांच्या पाया पडून सन्मान व्यक्त करत आहेत. ‘मीच तुमचा योग्य प्रतिनिधी’ हा संदेश मतदारांच्या मनावर बिंबवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काहींनी आधीच संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता चार सदस्यीय प्रभाग रचनेनंतर प्रत्येक उमेदवाराला केवळ स्वतःच्या नव्हे, तर शेजारील प्रभागांतही स्वतःचा ठसा उमटवावा लागणार आहे.
आगामी गणेशोत्सव हा इच्छुक उमेदवारांना संपर्क वाढविण्यासाठी मोठी पर्वणी मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या काळात प्रत्येक घरातील माणूस सक्रिय असतो. विविध उपक्रम राबवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा हा काळ उमेदवारांना पर्वणी ठरणार आहे.